Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान ही वर्षा या बंगल्याची ओळख आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या बंगल्याबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे. वर्षा बंगल्यावर जादूटोणा झाला आहे, रेड्याची शिंगं पुरली आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी जात नाहीत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान उद्धव ठाकरे काळ्या जादूचे बादशहा आहेत अशी टीका एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्याने केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊत सोमवारी काय म्हणाले होते?

संजय राऊत म्हणाले होते, “देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला का घाबरत आहेत? त्यांचं कुटुंब का घाबरत आहे? वर्षा बंगल्यावर असं काय घडलं आहे की फडणवीस तिथे जायला घाबरत आहेत? हा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी चिंतेचा व संशोधनाचा विषय आहे. मी कुठेही म्हटलं नाही की तिथे लिंबू-मिरच्या असतील. ‘वर्षा’ हा सरकारने मुख्यमंत्र्यांना दिलेला अधिकृत बंगला आहे आणि फडणवीस या बंगल्यावर जायला तयार नाहीत. त्यांना नेमकी कसली भीती वाटते आहे? तिथे नेमकं काय घडलंय? की याआधी तिथे असणाऱ्यांनी घडवलंय? राज्यातील जनतेसाठी हा चिंतेचा विषय आहे”. असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता. त्यावर रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे हे काळ्या जादूचे बादशहा आहेत असं म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे.

काय म्हणाले रामदास कदम?

“उद्धव ठाकरे हे काळ्या जादूचे बादशहा आहेत, ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला, त्यावेळी वर्षा बंगलामध्ये एक टोपलीभर लिंबं सापडली होती हे एकनाथ शिंदे यांनीही सांगितलं आहे. असं वक्तव्य आता रामदास कदम यांनी केलं आहे. संजय राऊत आणि सामना कडून एकनाथ शिंदे यांची सातत्याने बदनामी केली जात आहे… त्यामुळे एकनाथ शिंदे संजय राऊत यांच्या विरोधात कोर्टात जावं असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत रामदास कदम यांनी हे वक्तव्य केलं आहे.

उद्धव ठाकरेंना जनतेने त्यांची जागा दाखवली-रामदास कदम

उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यावरही रामदास कदम यांनी टीका केली आहे. रामदास कदम म्हणाले एकीकडे देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यायची आणि दुसऱ्या दिवशी अमित शाह यांना अफझल खान म्हणायचं. हे यांचं धोरण. तसंच संजय शिरसाट यांनी जे मत मांडलं ते त्यांचं एकट्याचं मत असू शकतं. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्र होण्याची काहीही शक्यता नाही. एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांची शिवसेना सांभाळली आहे. जर आम्ही उद्धव ठाकरेंबरोबर असतो तर आमचे आमदारही निवडून आले नसते. एकनाथ शिंदेंनी ८० जागा लढवल्या आणि ६० आमदार निवडून आणून दाखवले ही बाब महत्त्वाची आहे. काँग्रेस बरोबर जाऊन मुख्यमंत्रिपद घेतलं की काय होतं हे उद्धव ठाकरेंना जनतेने दाखवून दिलं आहे असंही रामदास कदम म्हणाले.