युती-आघाडी करण्याची चर्चा वर्तमानपत्रे किंवा चॅनेलच्या माध्यमातून केली जात नाही. हे सारे लोकांना दाखवण्यासाठी केलं जात आहे. मूळात मनसेशी युती करण्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनातच नाही आणि खुद्द भाजप नेत्यांनीच मला हे सांगितलं आहे, असा खणखणीत गौप्यस्फोट करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी महायुतीतील राजकारणावर हल्लाबोल चढवला. आपले खासदार निवडून आल्यानंतर नरेंद्र मोदींनाच पाठिंबा देतील, असे जाहीर करतानाच ‘मोदींचा मुखवटा घालण्याची मला गरज नाही’ अशा शब्दांत राज यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली.
पुणे लोकसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवारी दीपक पायगुडे यांच्या प्रचारासाठी मूठा नदीच्या पात्रात सोमवारी सायंकाळी झालेल्या सभेद्वारे राज यांनी मनसेच्या प्रचाराचा नारळ फोडला. ‘काही जुन्या गोष्टी तुमच्यासमोर मांडायच्या आहेत’ अशा शब्दांत भाषणाची सुरुवात केल्यानंतर राज ठाकरे यांनी मनसेला महायुतीत घेण्यावरून- न घेण्यावरून झालेल्या घडामोडीच जनतेसमोर उघड केल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेच्या मुखपत्रात आलेल्या मुलाखतीत उद्धव यांनी ‘आम्ही टाळीसाठी हात पुढे करू’ असे म्हटले होते. त्याचा संदर्भ देत राज म्हणाले,‘खरंच जर चर्चा करायची होती, तर मला फोन करायचा होता.’ गेल्या काही महिन्यांमध्ये भाजपचे नेते महायुतीत सहभागी होण्यासाठी गळ घालत होते, असे सांगताना राज यांनी पुण्यात गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत आणि मुंबईत नितीन गडकरी यांच्यासोबत झालेल्या भेटीतील चर्चेचा तपशीलही मांडला. राज-मुंडे यांच्या पुण्यातील या भेटीचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केल्यानंतर मुंडे यांनी या भेटीचा इन्कार केला होता, हे विशेष!
‘आम्ही महायुतीत येणे हे तुमच्या शिवसेनेला चालणार नाही’ असे मी मुंडे यांच्याशी झालेल्या भेटीत म्हटले होते. त्यावेळी मुंडे यांनी ‘ते माझ्यावर सोडा, मी बघून घेईन’ असे म्हटले होते. मात्र, त्यानंतर कोणीच संपर्क साधला नाही. पुढे मुंबईतील भेटीदरम्यान गडकरी यांनी ‘यंदाची निवडणूक लढवू नका’ अशी विनंती केल्याचेही राज यांनी सांगितले.
‘महायुतीमध्ये मी असावे, हे उद्धव यांच्या मनातच नाही, असे मला भाजपचे नेतेच सांगतात. एकमेकांनी ‘अॅडजेस्टमेंट’ करायची आणि राज ठाकरेच्या नावावर ‘बिलं’ फाडायची हे चालणार नाही,’ अशा शब्दांत राज यांनी शिवसेना-भाजपवर हल्लाबोल केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा