महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मागील काही दिवसांपासून आजारी असल्याचं वृत्त आहे. त्यांना डेंग्यू झाल्याची माहिती अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली होती. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना अजित पवार आजारी असल्याचं वृत्त समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. अजित पवारांना राजकीय डेंग्यू झाला आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती.
दरम्यान, अजित पवार यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. शिवाय ते पवार कुटुंबाच्या एका कार्यक्रमातही सहभागी झाले. यावर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांना नेमका कसला ताप आहे, हे माहीत नाही. त्यांना ताप आहे की मनस्ताप हे त्यांनाच माहीत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला आहे. ते शनिवारी (११ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत बोलत होते.
हेही वाचा- “त्या नासक्याला सांगा…”; शिंदे गटाच्या नेत्यावर जितेंद्र आव्हाड भडकले, म्हणाले…
उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंब्र्यातील जमीनदोस्त केलेल्या शिवसेना शाखेची पाहणी केली. यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका मांडली. शिंदे गटाकडून पाडण्यात आलेली शिवसेना शाखा आमची असून त्याबाबतचे सर्व कागदपत्रे आमच्याकडे आहेत, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. यावेळी त्यांनी अजित पवार आजारी असल्याच्या चर्चेवरून टोला लगावला.
हेही वाचा- “माझ्या केसाला जरी धक्का लागला तरी…”, मुंब्र्यातील शाखेवरून उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला इशारा
अजित पवारांनी दिल्लीत अमित शाहांची भेट घेतली. तसेच ते पवार कुटुंबाच्या कार्यक्रमातही सहभागी झाले. त्यामुळे त्यांना राजकीय ताप आहे का? असा सवाल विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले, “माझा आता अजित पवारांशी कसलाही संपर्क नाहीये. त्यामुळे त्यांना नेमका कसला ताप आहे? सहकाऱ्यांचा ताप आहे की मनस्ताप आहे? हे त्यांनाच माहीत. यावर मी नंतर कधीतरी बोलेन. पण आज एकच सांगायचं आहे की, यांचा (शिंदे गटाचा) सत्तेचा माज उतरवण्यासाठी आम्ही सगळेजण रस्त्यावर उतरलो आहोत. महाराष्ट्रातील जनतेला एवढंच सांगू इच्छितो की आम्ही मजबुतीने तुमच्याबरोबर उभे आहोत.”