राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली आहे. संबंधित आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा जाहीर केला आहे. सत्तेत सामील झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांना शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रीपदं दिली आहेत. यामुळे भाजपासह शिंदे गटाचे काही नेते नाराज झाले आहेत. पण भारतीय जनता पार्टीने आगामी लोकसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून अजित पवार गटाला सत्तेत समाविष्ट करून घेतलं आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

२०१९ साली अमित शाहांनी दिलेला शब्द पाळला असता, तर आता फोडाफोडीचे धंदे करावे लागले नसते, अशा आशयाची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तेव्हा अमित शाहांनी शब्द मोडला नसता तर आता भाजपा आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री प्रत्येकी अडीच वर्षे राहिला असता, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. ते यवतमाळ येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा- शरद पवारांना आणखी एक धक्का? अत्यंत विश्वासू सहकारी व माजी मंत्री अजित पवार गटाच्या वाटेवर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय नेत्यांकडून महाराष्ट्रात सत्तासंघर्ष घडवला जातोय, असं तुम्हाला वाटतं का? असं विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले, “नाहीतर, याचा दुसरा अर्थ काय आहे. आता त्यांच्याकडून (भाजपा) फोडाफोडीचे जे धंदे सुरू आहेत. त्याबाबत मी काही गोष्टी एक-एक करत बोलत जाणार आहे. शिवसेना व भाजपाला प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद हे सूत्र त्यावेळी माझं आणि अमित शाहांचं ठरलं होतं की. हे मी याआधीही माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन शिवाजी पार्कवर सांगितलं आहे.”

हेही वाचा- मोठी अपडेट: नऊ आमदार वगळता सर्व आमदारांचा शरद पवारांना पाठिंबा? जितेंद्र आव्हाडांचं मोठं विधान

“आजही पोहरादेवीची शपथ घेऊन सांगते, २०१९ मध्ये अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि अडीच वर्षे भाजपाचा मुख्यमंत्री असंच ठरलं होतं. त्याप्रमाणे अमित शाह वागले असते तर कदाचित अडीच वर्षे भाजपाचा किंवा शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊन गेला असता. पण आज भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांना इतर पक्षाच्या नेत्यांच्या सतरंज्या उचलाव्या लागत आहेत. भाजपाचे जुने, ज्येष्ठ नेते किंवा कार्यकर्ते ज्यांनी आयुष्यभर भाजपासाठी खस्ता खाल्या. त्या खस्ता खाल्लेल्या कार्यकर्त्याला आता बाहेरून येणाऱ्या नेत्यांचा पाहुणचार करावा लागत आहे,” अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

Story img Loader