मध्य प्रदेशात भाजपाचे सरकार आल्यास भाविकांना रामलल्लाचे मोफत दर्शन घडवण्यात येईल. त्याचा खर्च भाजपा सरकार करेल, असं आश्वासन गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी दिलं होतं. यावर शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. ते ‘मातोश्री’ येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, “कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘बजरंगबली की जय’ म्हणत मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. गृहमंत्री अमित शाह यांनी मध्य प्रदेशात ‘रामल्लाचे दर्शन मोफत घडवू’ असं जाहीर केलं आहे. अमित शाहांनी फक्त मध्य प्रदेशपुरतं ही घोषणा करू नये. देशातील कानाकोपऱ्यात रामभक्त आहेत. त्या भक्तांना सोयीनुसार मोफत अयोध्या वारी करावावी.”
हेही वाचा : अमित शाह म्हणाले ‘रामाचं मोफत दर्शन’, राज ठाकरेंचा टोला; “भाजपाने टूर्स अँड ट्रॅव्हल्स खातं…”
“२२ जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन आहे. देशातील ५ ते १० कोटी लोक राम मंदिराच्या उद्घाटनासाठी भाजपा आणू शकते. तेव्हा, भक्तांना अयोध्येत आणून मोफत दर्शन घडवल्याचं सांगतील. पण, तसं नाही. रामलल्लाचे दर्शन राम भक्तांना वाटेल, तेव्हा घडवून दिलं पाहिजे,” अशी मागणी उद्धव ठाकरेंनी भाजपाकडे केली आहे.
हेही वाचा : “भाजपाला फ्री हिट आणि आमची हिट विकेट”, उद्धव ठाकरेंचं क्रिकेटच्या भाषेत आयोगावर टीकास्र!
“पंतप्रधान ज्याअर्थी ‘बजरंगबली की जय’ म्हणत मतदानाचं बटण दाबण्याचं आवाहन करतात. त्याप्रमाणेच आम्ही देखील येत्या निवडणुकीत जनतेला आवाहन करतो की, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘हर हर महादेव,’ ‘जय श्रीराम’ बोलून मतदान करा. राज्यकर्त्यांना सुबुद्धी मिळो म्हणून ‘गणपती बाप्पा मोरया’ बोलून मतदान करा,” असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.