केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्य प्रदेशातील निवडणुकीच्या प्रचारात ‘भाजपाला मत दिल्यास राम लल्लाचं मोफत दर्शन घडवू’ असं आश्वासन दिलं होतं. यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. याबाबत एक पत्रही त्यांनी निवडणूक आयोगाला लिहिलं आहे. धर्माच्या किंवा देवाच्या नावाने मतं मागितल्यास कारवाई होणार नसेल तर भविष्यात आमच्यावरही कारवाई करता कामा नये, अशा इशारा उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “निवडणूक प्रचारात देवाच्या नावाने किंवा धर्माच्या नावाने मतं मागितल्यावर तो गुन्हा होतो की नाही? याबाबत मी निवडणूक आयुक्तांना पत्र दिलं आहे. त्यात उदाहरणासह नमूद केलं आहे की, कर्नाटकच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी ‘बजरंग बली की जय म्हणत मतपेटीचं बटन दाबा’ असं म्हणाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेही मध्य प्रदेशाच्या निवडणुकीत ‘भाजपाला मत दिल्यानंतर आम्ही राम लल्लाचं दर्शन फुकट करून देऊ’, असं म्हणाले होते.”

हेही वाचा- “बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या”; राऊतांच्या वक्तव्यावर अजित पवार गटाच्या नेत्याचं उत्तर, म्हणाले, “जनादेश…”

“त्याच वेळी मी आठवण करून दिली होती. या देशातील नव्हे तर जगातील एकमेव हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या एका भाषणात हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. राम मंदिराचा मुद्दा घेतला होता. त्यावेळी निवडणूक आयोगानं त्यांच्यावर सहा वर्षे निवडणूक लढवायला बंदी घातली होती. हे कमी होतं म्हणून की काय त्यांचा मतदानाचा मुलभूत अधिकारही काढून घेतला. आज त्यात काही बदल झाला आहे का? असा प्रश्न पत्राद्वारे मी निवडणूक आयोगाला विचारला होता.त्यावर आयोगाचं अद्याप काहीही उत्तर आलं नाही. उत्तर आलं नाही, तर याचा अर्थ आम्ही असा घ्यायचा का? की देवाच्या नावाने किंवा धर्माच्या नावाने मतं मागण्यासाठी तुमची काहीही हरकत नाही. यावर थोड्या दिवसात तुमचं (निवडणूक आयोग) उत्तर आलं नाही, तर आम्ही तुमची मान्यता गृहीत धरुन येत्या प्रत्येक निवडणुकीत ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’, ‘गणपती बाप्पा मोरया’ असे हिंदुत्वाचे विचार उघडपणे मांडू. मग त्यावेळी मात्र आपण करवाई करता कामा नये. तुम्हाला कारवाई करता येणार नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे,” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी इशारा दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray on amit shaha statement in mp election free ram temple visit election commission rmm