Uddhav Thackeray On Mahayuti : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज शिर्डी आणि छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूवीर उद्धव ठाकरे यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यावेळी त्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या महाअधिवेशनाला हजेरी लावली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर हल्लाबोल केला. तसेच गेलेली सत्ता पुन्हा येईल. गेलेली सत्ता पुन्हा खेचून आणणार आहे, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी महायुतीच्या नेत्यांना दिला आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
“मी देखील या ठिकाणी आलो आहे. मला सत्तेची पर्वा नाही. मला तुमच्या आयुष्याची चिंता आहे. मला तुमच्या कुटुंबाची पर्वा आहे. सत्ता येत असते आणि सत्ता जात असते. गेलेली सत्ता पुन्हा येणार आहे. गेलेली सत्ता पुन्हा खेचून आणणार आणि सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र, एक लक्षात घ्या, एकजूट महत्त्वाची आहे. याआधी एकदा जुनी पेन्शन योजनेसाठी तुम्ही सर्वजण नागपूरला आला होतात. मात्र, तुमच्यापैकी एक घटक तिकडे गेला आणि तुमच्या आंदोलनावर पाणी ओतलं. जे फोडाफोडीचं राजकारण शिवसेनेबरोबर करण्यात आलं. हे जुनी पेन्शन योजनेसाठी आंदोलन करणाऱ्यांबरोबर देखील करतील. हे सरकार गेल्यात जमा आहे. खरं तर महायुतीच्या नेत्यांना सत्तेशिवाय उपाशी ठेवलं पाहिजे, असा निर्धार करायला हवा”, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर केला.
हेही वाचा : Sharad Pawar : “मी तुम्हाला शब्द देतो, एकदा राज्य हातामध्ये द्या, मग…”, शरद पवारांचा महायुतीवर हल्लाबोल
“विधानसभेची निवडणूक जवळ येईपर्यंत ज्यांना आपली बहीण माहिती नव्हती. त्यांनी लाडकी बहीण योजना आणली. आता दोन महिन्यांनी निवडणुका आहेत. मी तुम्हाला वचन देतो की, दोन महिन्यांनी आपलं सरकार आलं तर मी तुमची जुनी पेन्शन योजनेची मागणी मान्य करतो. आता मी ही घोषणा केल्यानंतर महायुतीला घाम फुटेल आणि ते ही तुमची मागणी कदाचित मान्य करतील. हा दगाफटका तुम्हाला नाही तर महाराष्ट्राला होणार आहे. पण तुम्ही एक लक्षात घ्या ज्यांनी माझ्याशी गद्दारी केली त्यांना मी कुटुंबातील मानलं होतं. ते विश्वासघात करू शकतात मग हे तुमच्यावर वार करू शकणार नाहीत का? त्यामुळे मला हे सरकार नको आहे. मला मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न तेव्हाही नव्हतं आणि आताही नाही”, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर केला.
“मला सत्तेमधून कोणीही निवृत्त करु शकत नाही. मी सत्तेत असलो किंवा नसलो तरी जोपर्यंत जनता माझ्याबरोबर आहे. तोपर्यंत सत्ता ही आपल्याकडेच राहील. कारण जनतेची सत्ता आहे. सरकार वेगळं असलं तरी जनतेची सत्ता ही महत्वाची असते. जनता हीच माझी ताकद आणि जनता हीच माझी सत्ता आहे”, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.