शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यात गेल्या दोन दिवसांपासून राजकीय उलथापालथ सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्याला एकूण ४६ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकार दोलायमान अवस्थेत असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राजकीय घडामोडी विधानसभा बरखास्तीच्या दिशेने जात असल्याचं ट्वीट केल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यास ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भूमिका मांडून एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढवण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मी आज राजीनाम्याचं पत्र तयार ठेवतोय”

दरम्यान, यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भावनिक शब्दांमध्ये भूमिका मांडली. “समोर बसा. मी आज माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार ठेवतो आहे. हा कुठेही लाचारीचा प्रसंग नाही. मजबुरी अजिबात नाही. काय होईल जास्तीत जास्त? परत लढू. जोपर्यंत माझ्यासोबतच शिवसैनिक आहेत, तोपर्यंत मी कोणत्याही संकटाला भीत नाही. मी आज शिवसैनिकांनाही आवाहन करतोय. ही शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही असं जे म्हणतात त्यालाही माझ्याकडे उत्तर आहे. जर शिवसेनेच्या कार्यकर्त्याला वाटत असेल की मी शिवसेना प्रमुख पद सांभाळायला नालायक आहे, तर मी शिवसेना प्रमुखपदही सोडेन. पण समोर येऊन सांगायला हवं. मी मुख्यमंत्रीपद आणि शिवसेना प्रमुखपद सोडेन. मी मुख्यमंत्रीपद सोडून पुन्हा शिवसेनेचाच मुख्यमंत्री होत असेल, तर मला आनंद आहे. पण एकदा मला समोर येऊन सांगा. समोर या, आणि सांगा”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

“हे माझं नाटक नाही, पदावरून पायउतार होईन”

दरम्यान, मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होत असल्याचं सांगताना आपण कोणतंही नाटक करत नसल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. “एकच सांगेन. पदं येत असतात, जात असतात. आयुष्याची कमाई पदं नसतात. तिथे बसून तुम्ही जे काम करता, त्यानंतर जनतेची जी प्रतिक्रिया असते, ती कमाई असते. या अडीच वर्षात आपली कुठे भेट झाली? याच माध्यमातून आपण भेटलो आहोत. ही आयुष्याची कमाई माझ्यासाठी भरपूर आहे. मुख्यमंत्रीपद तेव्हा अनपेक्षितपणे आलं. तुम्ही सांगाल, तर मी आत्ता त्यावरून पायउतार होईन. हे माझं नाटक नाही. या लोकशाहीत ज्यांच्याकडे संख्या जास्त आहे, तो जिंकतो. मग तुम्ही ती कशी जमवता, हे महत्त्वाचं नसतं. मी ज्यांना माझे मानतो, त्यांच्यापैकी कितीजण तिकडे गेलेत? माझ्याविरुद्ध मतदान केल? हे महत्त्वाचं नाही. माझ्याविरोधात एकानंही मतदान केलं, तरी माझ्यासाठी ती लाजिरवाणी बाब आहे”, असंही उद्धव ठाकरे यावेळी फेसबुक लाईव्हमध्ये म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray on eknath shinde revolt shivsena crises bjp alliance pmw