शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. या जयंतीनिमित्त शिवसेनेकडून (ठाकरे गट) एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमातून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. सध्या देशात वडील चोरणारी औलाद फिरत आहे, असं मी दसरा मेळाव्यात म्हटलं होतं. दुसऱ्यांचा वडील चोरता-चोरता स्वत:चे वडील लक्षात ठेवा, नाहीतर त्यांना विसरायचे, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आज बाळासाहेब ठाकरे, प्रमोद नवलकर आणि सुभाषबाबुंचा जन्मदिवस आहे. आज विधानभवनात तैलचित्राचं अनावरण होतंय. मला दुपारी तैलचित्राबद्दल विचारलं, तेव्हा मी म्हटलं मी अजून तैलचित्र बघितलं नाही. ज्या कलाकाराने चित्र चितारलं असेल, त्यांचा मला अपमान करायचा नाही, पण हे चित्र काढण्यासाठी पुरेसा वेळ दिला का? हे विचारणं गरजेचं आहे. घाई-गडबडीत काहीतरी रंगवून ठेवायचं आणि म्हणायचं ‘हे घे तुझे वडील’ असं अजिबात चालणार नाही.”

हेही वाचा- “नातू आहे म्हणजे अक्कल आली असं होत नाही,” संजय शिरसाट आदित्य ठाकरेंवर संतापले; म्हणाले, “त्यांना गल्लीत…”

एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता टीका करताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “दसरा मेळाव्यात ‘वडील चोरणारी औलाद’ असा उल्लेख मी केला होता. आता दुसऱ्यांचे वडील चोरता-चोरता स्वत:चे वडील लक्षात ठेवा, नाहीतर ते तुम्ही विसरायचे. वडील कोण? असं विचारलं तर ‘काय माहिती’ म्हणाल. कारण इकडे शिवसेनाप्रमुखांचे विचार, तिकडे ‘मोदी का आदमी’, काल म्हणाले शरद पवार ‘गोड माणूस’ आहे.” तुम्ही नक्की कुणाचे फोटो लावणार आहात? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.

हेही वाचा- “…तर राऊतांना बाळासाहेबांनी पायाखाली तुडवलं असतं”, संजय गायकवाडांची संतप्त टीका!

“महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना सरकार का पाडलं? तर हिंदुत्व सोडलं आणि शरद पवारांच्या आहारी गेले, म्हणून सरकार पाडलं असं सांगितलं. पण आता हेच काल सांगतात शरद पवार खूप गोड माणूस आहे. मी फोनवरून त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. मग मी काय घेत होतो?” असंही उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे तैलचित्र लावत आहात, तुमची कृती चांगली आहे. मला त्याचा आनंद आहे, अभिमान आहे. पण तुमचा त्यामागचा हेतू वाईट आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray on eknath shinde theft father balasaheb thackeray latest update rmm