Uddhav Thackeray : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चा होती की, शिवसेना ठाकरे गट विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार आहे. यावरून ठाकरे गट कोणाचं नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी देणार? याबाबतही अनेक चर्चा रंगल्या होत्या. यानंतर अखेर आज शिवसेना ठाकरे गटाकडून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पत्र देत विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यात आला आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी आमदार भास्कर जाधव यांचं नाव विधानसभेच्या अध्यक्षांकडे देण्यात आलं आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच महाविकास आघाडीत विरोधी पक्षनेतेपदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला असणार आहे का? याबाबतही उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
“गेल्या काही दिवसांपासून एक प्रश्न विचारला जात होता की विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना ठाकरे गट दावा सांगणार आहे की नाही? आज शिवसेनेने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. सहाजिकच आहे की काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) असो, आम्ही या पुढची वाटचाल एकत्र करणार आहोत. तसेच इतर सर्व गोष्टींवर आमची चर्चा देखील सुरु आहे. तसेच पुढेही आम्ही एकत्रित चर्चा करून पुढे निर्णय घेत राहणार आहोत”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
विरोधी पक्षनेतेपदासाठी कोणाचं नाव?
“आम्ही आज विधानसभेच्या अध्यक्षांकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाची मागणी केलेली आहे. आम्हाला खात्री आहे की, लवकरात लवकर यासंदर्भातील निर्णय होईल. तसेच अर्थसंकल्पाच्या आधी हा निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या प्रकारे कारभार करत आहेत, ते पाहता विरोधी पक्षनेतेपदाच्या बाबतीत निर्णय लवकर होईल अशी आमची आपेक्षा आहे”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
विरोधी पक्षनेतेपदाचा फॉर्म्युला ठरलाय का?
महाविकास आघाडीत विरोधी पक्षनेतेपदासाठी काही फॉर्म्युला ठरलाय का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले, “विरोधी पक्षनेतेपदाचा काही फॉर्म्युला महाविकास आघाडीत ठरलेला नाही”, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
“धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने सर्व आमदारांनी भूमिका मांडली. आता सर्वांना प्रश्न असा आहे की, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचे फोटो सरकारकडे आधी आले नव्हते का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पारदर्शीपणे काम करत असतील तर त्यांचं स्वागत आहे. पण पारदर्शीपणे काम करत असताना त्यांचे हात कोणी बांधतंय का? हा प्रश्न आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचे फोटो आधीच मुख्यमंत्र्यांकडे आले होते का? जर आले असतील तर मग धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची कारवाई आधीच का झाली नाही ?”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
“मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रश्नांचं उत्तर द्यायला पाहिजे. डिसेंबरपासून बीडच्या घटनेची चर्चा सुरु आहे. यानंतर आज धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आणि राजीनामा देताना त्यांनी तब्येतीचं कारण दिलं. मी त्यांच्या तब्येतीबाबत काही बोलणार नाही. पण राजीनामा देण्याचं नेमकं कारण काय? नैतिक जबाबदारी की तब्येतीचं कारण? हे स्पष्ट करावं. कारण अजित पवारांनी असं सांगितलं की धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला. आता बीडच्या घटनेतील एवढे फोटो बाहेर आल्यानंतर देखील धनंजय मुंडेंनी तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा दिला असेल तर याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. सरकारने धनंजय मुंडेंचा राजीनामा या आधीच का घेतला नाही? मग आता राजीनामा दिला आहे तर तो कोणत्या कारणाने दिला? हे देखील सांगितलं पाहिजे”, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.