Uddhav Thackeray : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार १५ डिसेंबर रोजी पार पडला. यामध्ये भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या काही आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पण या मंत्रिमंडळात काही दिग्गज नेत्यांना स्थान मिळालं नाही. त्यामुळे महायुतीतील काही नेते नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी आपली नाराजी जाहीर बोलून दाखवली आहे. एवढंच नाही तर आपण कार्यकर्त्यांशी बोलून पुढील भूमिका ठरवणार असल्याचंही छगन भुजबळांनी सांगितलं. दरम्यान, या सर्व घडामोडींवर तसेच छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडूनही महायुतीवर टीका करण्यात येत आहे. आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत मोठं भाष्य केलं आहे. छगन भुजबळ हे अधूनमधून संपर्कात असल्याचं सांगत महायुतीमधील नाराज नेत्यांचेही मला निरोप येत असल्याचं मोठं विधान उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
महायुतीच्या मंत्रिमंडळात काही नेत्यांना डावलण्यात आल्यामुळे काहीजण नाराज असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया विचारली असता उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, “मला कोणीतरी विचारलं की तिकडे (महायुतीत) नाराज झालेले नेते तुमच्या संपर्कात आहेत का? तर मला त्यांचे निरोप येत आहेत. आता त्यांना कळतंय की तुमची म्हणजे माझी भूमिका बरोबर होती. पण शेवटी अनुभवासारखा उत्तम गुरु नसतो. शेवटी अनुभव हाच चांगला गुरु त्यांना मिळाला आहे. त्यामुळे आता त्यांनाही अनुभव येऊ द्या मग पाहू”, असं भाष्य उद्धव ठाकरे यांनी केलं.
हेही वाचा : “त्यांच्याबद्दल मला फार वाईट वाटलं”, भुजबळांच्या प्रश्नावर नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
‘मातोश्री’चे दरवाजे नाराजांसाठी उघडे असतील का?
महायुतीत मंत्रिपद न मिळाल्याने काही नेते नाराज झाल्याची चर्चा आहे. यासंदर्भात नाराज नेत्यांसाठी ‘मातोश्री’चे दरवाजे उघडे असतील का? असा प्रश्न पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले की, “मला २०१९ साली अनुभव हा गुरु मिळाला. आता जे नाराज झाले आहेत त्यांनाही अनुभव हा गुरु मिळतोय. त्यामुळे ते त्यामधून काय धडा घेतात? त्यावर सर्व अवलंबून असेल”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.
छगन भुजबळांनी तुम्हाला संपर्क केला आहे का?
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली. छगन भुजबळांच्या नाराजी संदर्भात उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी भुजबळांनी तुम्हाला संपर्क केला आहे का? असं विचारलं असता यावर उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, “छगन भुजबळांनी अद्याप मला संपर्क केला नसला तरी ते अधूनमधून माझ्या संपर्कात असतात.”