Uddhav Thackeray : विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सध्या सुरु आहे. निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलं आहे. सध्या निवडणुकीच्या प्रचार सुरु आहे. उद्या (१८ नोव्हेंबर) प्रचाराचा शेवटचा दिवस असणार आहे. त्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर आज अनेक नेत्यांच्या विविध मतदारसंघात जाहीर सभा पार पडल्या तर उद्धव ठाकरे यांची मुंबईत जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ‘डोक्याला ब्राह्मी तेल लावा, बरं असतं. मग दोन्ही गोष्टी होतील. केस पण वाढतील आणि बुद्धीलाही चमक येईल”, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर केली.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. पंतप्रधान मोदींनी ट्वीट केलं की नाही? तर केलं. कारण ट्वीट नसतं केलं तर पंचाईत झाली असती. कारण राहुल गांधींनी ट्वीट केलं. मला अमित शाह यांनी म्हणाले की उद्धव बाबू. मी त्यांना म्हणालं हा बोला अमित शेठ. ते म्हणाले तुम्ही काँग्रेसबरोबर बसलात. म्हणजे ज्यांनी ३७० कलम रद्द करण्याला विरोध केला आणि त्यांच्याबरोबर तुम्ही गेलात. मी त्यांना म्हटलं की अमित शेठ, ३७० कलम रद्द करताना ज्या पक्षांनी तुम्हाला पाठिंबा दिला त्यामध्ये शिवसेनाही होती. हे तुम्ही कसे विसरलात? मग जरा डोक्याला ब्राह्मी तेल लावा, बरं असतं. मग दोन्ही गोष्टी होतील. केस पण वाढतील आणि काही बुद्धी शिल्लक असेल तर तिलाही चमक येईल”, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर केली.

हेही वाचा : “पंकजाताई मुंडे तुझे धन्यवाद…”, उद्धव ठाकरेंनी केलं कौतुक; म्हणाले, ‘तुम्ही महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढली’

“तुम्ही ३७० कलम रद्द केलं ठीक आहे. मात्र, आज महाराष्ट्राची जीवन मरणाची निवडणूक आहे. मी आता परत एकदा सांगतो. माझ्या मनात गुजरातबाबत काहीही राग नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे यामध्ये भिंत घालण्याचं काम करत आहेत. त्यामुळे तुम्ही सर्वांनी खबरदारी घ्या. आमचं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मी पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणता निर्णय घेणार तर अदानी यांच्या घशात घातलेली मुंबई पहिली काढून घेणार आहे. आपलं सरकार का पाडलं? कारण त्यांना मी महाराष्ट्र लूटू देत नव्हतो”, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर केली.

‘…तर एमएमआरडीए रद्द करेन’

“महाविकास आघआडीचे सरकार आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत अदाणीच्या घशात घातलेली मुंबई सर्वात आधी काढून घेऊन. धारावीकरांना त्यांचे घर आणि उद्योगासह तिथेच पुनर्वसन केले जाईल. ज्या जागा अदाणीला दिल्या आहेत त्या काढून घेऊ. तसेच एमएमआरडीएबरोबर केलेला करार मोडीत काढू. मुंबई मनपा स्वायत्त आहे, तिच्या अधिकारावर गदा आणत असाल तर कदाचित मी एमएमआरडीएदेखील रद्द करून टाकेल. नीती आयोगालाही मुंबईतून बाहेर काढू. तसेच मुंबई महानगर प्रदेशात मुंबईकरांसाठी परवडणाऱ्या दरात घरे बांधून देईन, हेदेखील वचन मी देत आहे.”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.