लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. १ ऑगस्ट रोजी टिळक महाराष्ट्र विद्यापीठात होणाऱ्या कार्यक्रमात ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी नेते उपस्थित राहणार आहे.
या उपस्थितीवरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवारांच्या उपस्थितीत ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ स्वीकारणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केलेल्या ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचं काय झालं? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, “मी आजच वृत्तपत्रात बातमी वाचली. येत्या काही दिवसांत पंतप्रधान मोदी यांना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ दिला जाणार आहे. या पुरस्कार सोहळ्यात शरद पवारही उपस्थित राहणार आहेत. दोन्ही नेते एकाच मंचावर येत असतील तर मग राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केलेल्या ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचं काय झालं? मला त्यांचं तारतम्यचं कळत नाही.”
हेही वाचा- “मी जे म्हटलं ते योग्यच! हे कलंकितच लोक, कारण…”; उद्धव ठाकरेंची पुन्हा भाजपावर जोरदार टीका
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असं लोकमान्य टिळकांनी ब्रिटीशांना ठणकावून सांगितलं होतं. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असा प्रश्न लोकमान्य टिळकांनी विचारला होता. आता हाच प्रश्न कोण विचारणार? कुणाला विचारणार? आणि याचं उत्तर कोण देणार? ज्यांच्यावर तुम्ही ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. आता तोच पक्ष तुमच्याबरोबर आला आहे. शरद पवार तुमच्याबरोबर व्यासपीठावर असणार आहेत. आमच्यातले मिंधेही तुमच्याबरोबर असणार आहेत. त्यामुळे लोकांनी याकडे कसं बघायचं? म्हणजे कोण कुणाला कलंक लावतंय? आपण एक माणुसकी म्हणून एकमेकांचा आदर ठेवला पाहिजे. जे काही आरोप करत असाल, ते आरोप करताना जबाबदारीने वागा. आरोप केल्यानंतर त्यांना घाबरवून पक्षात घेतले आणि चौकशी बंद केली, असं करू नका. ज्यांना घाबरवून तुम्ही तुमच्या पक्षात घेतलं, त्यांच्या चौकशीचं पुढे काय झालं? असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.