महाविकास आघाडीच्या पालघर लोकसभेच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी आज (१२ एप्रिल) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपा, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. “नकली शिवसेना म्हणायला ती तुमची डिग्री आहे का?”, असा प्रश्न करत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
“गद्दारांचे दोन मालक सध्या महाराष्ट्रात फिरत आहेत. मी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते, मी यापुढे देशाच्या पंतप्रधानांवर टीका करणार नाही, तर नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणार आहे. ज्या शिवसेनेला महाराष्ट्राच्या न्याय हक्कासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केली, त्या शिवसेनेला महाराष्ट्रात येऊन तुम्ही नकली म्हणता? पण नकली शिवसेना म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे का?”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
हेही वाचा : महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “अमित शाह आले तेदेखील म्हणाले शिवसेना नकली आहे. आता मी भारतीय जनता पक्षाला म्हणतो की हा पक्ष भेकड आहे. मी भाजपाला भेकड यासाठी म्हणतो, कारण ईडी सीबीआय लावून दुसऱ्यांचे पक्ष फोडावे लागतात. अमित शाहांना विचारतो, तुमच्या भाजपात खऱ्या भाजपाचे किती नेते राहिले बघा. उद्धव ठाकरे जर संपले असतील तर मग विश्वगुरु असणारे पंतप्रधान मोदी यांना उद्धव ठाकरेंवर का बोलावे लागतेय. तिकडे चीन अरुणाचल प्रदेशमध्ये घुसत आहे. चीन घुसला तरी चालेल पण उद्धव ठाकरे संपला पाहिजे. मात्र, माझे त्यांना आव्हान आहे, उद्धव ठाकरेंना संपून दाखवा”, असेही ते म्हणाले.
“विरोधकांच्या मागे ईडी, सीबीआय लावायची आणि त्रास देण्याचे काम भाजपा करत आहे. अमोल किर्तीकर यांना उमेदवारी जाहीर झाली आणि लगेच ईडी मागे लागली. आता ज्या खिचडी घोटाळ्याचा आरोप अमोल किर्तीकर यांच्यावर केला जात आहे. त्या कंपनीचा मालक शिंदे गटात आहे. ते मोकळे फिरत आहेत आणि काम करणारे तुरुंगात पाठवले जात आहेत”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.