पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ कारागृहात असलेले शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना विशेष न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. हे प्रकरण आर्थिक गैरव्यवहाराऐवजी केवळ दिवाणी वादाचे असताना संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना विनाकारण अटक करण्यात आली. ही अटक बेकायदा असल्याचे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी नमूद केलं.
आज ( १० नोव्हेंबर ) संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्याचे नेतृत्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत असल्याचं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. “उपमुख्यमंत्री राज्याचं नेतृत्व करत आहेत. मी लवकरच त्यांची भेट घेणार आहे. तसेच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार आहे,” असेही संजय राऊत यांनी म्हटलं.
हेही वाचा : संजय राऊतांच्या सुटकेनंतर उद्धव ठाकरेंची मोदी सरकारवर टीका; म्हणाले, “न्यायालयच बुडाखाली घेण्याचा प्रयत्न…”
त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावरती प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारले. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “संजय राऊत माझ्याजवळ बसले असून, त्यांना काही करायचे असते, तर उघडपणे आणि परखडपणे करतात. संजय राऊतांना मांडवाली करायची असती, तर १०० दिवस तुरुंगात राहिले नसते. पण, त्यांनी दाखवून दिलं की, न भिता लढू शकतो. संजय राऊतांनी हे उदाहरण महाराष्ट्रापुरते नाहीतर देशापुढे उभं ठेवलं आहे.”
हेही वाचा : “कटुता जर संपवायची असेल तर…”, देवेंद्र फडणवीसांची संजय राऊतांच्या वक्तव्यावर सूचक प्रतिक्रिया!
“बेधुंद झालेल्या राज्यकर्त्यांना…”
“आम आदमी पक्षातील लोकही लढत आहे. तेलंगणातील केसीआर यांनी लाचखोरीचे प्रकरण समोर आणलं आहे. हेमंत सोरेन आणि ममता बॅनर्जी यांचा छळ सुरु आहे. मात्र, हे सगळे एकत्र आले, तर मोठी ताकद उभी राहिल, याची कल्पना बेधुंद झालेल्या राज्यकर्त्यांना आलेली दिसत नाही,” असा हल्लाबोलही उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर केला आहे. ते ‘मातोश्री’वर बोलत होते.