उद्धव ठाकरेंनी आज मुंबईत महापत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेच्या घटनेचे पुरावे दाखवले. जे जे निर्णय घेतले गेले आणि ठराव झाले त्याच्या व्हिडीओ क्लिप्सही सादर केल्या. अनिल परब, संजय राऊत यांनी भाषणं केली. व्हिडीओ दाखवून या सगळ्यांनी घटनेतले बदल निवडणूक आयोगाला कसं सगळं सादर केलं त्याचे पुरावे सादर केले. असीम सरोदे यांनीही एक भाषण करुन निकाल किती सोपा होता आणि तो वेळ काढून कसा चुकीचा दाखवला गेला, हे पुराव्यांनिशी सांगतं. यानंतर उद्धव ठाकरेंनी भाषण करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना खुलं आव्हान दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्धव ठाकरेंनी काय आव्हान दिलं आहे?

मागच्या आठवड्यात लबाडाने जो निकाल दिला. नाही नाही लवादाने जो निकाल दिला त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. आता सर्वोच्च न्यायालयाकडून आशा आहेतच. आज जनतेच्या न्यायालयात आम्ही आलो आहोत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. देशातला मतदार हा सरकार ठरवत असतो. कदाचित जगात आपला एकमेव किंवा खूप कमी देश असे आहेत ज्यांनी संविधान जनतेच्या चरणी अर्पण केलं आहे. जे काही गोष्टी समोर आणायच्या आहेत त्या आणल्या आहेत. राहुल नार्वेकर आणि मिंध्यांनी माझ्याबरोबर उभं रहावं तिथे नार्वेकरांनी सांगावं शिवसेना कुणाची. पोलीस संरक्षण न घेता जाहीर करा. मग कुणाला पुरावा, गाडावा आणि तुडवावा ते जनता ठरवेल असं म्हणत एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकरांना दिलं आहे.

राहुल नार्वेकरांना लवाद म्हणून निर्णय घ्यायला सांगितलं होतं

राहुल नार्वेकरांना लवाद म्हणून निर्णय घ्यायला सांगितलं होतं. तुमच्याबरोबर जर सगळं काही आहे, शिवसेना विकली असेल तर विकता येणार नाही हे लक्षात ठेवा. व्हीप तुमचा वगैरे आम्हाला लागू होणार नाही. व्हीपचा मराठी अर्थ चाबूक आहे. चाबूक आमच्या हातात शोभून दिसतो लाचारांच्या हातात नाही. जी काही थट्टा चाललेली आहे ती आज तुम्ही पाहिली. मला तर वाटतं आता निवडणूक आयोगावरच केस करायला हवी. जवळपास १९ लाख शपथपत्रं दिली आहेत. १०० रुपयांच्या स्टँप पेपवर प्रतिज्ञापत्रं दिली होती. त्याच्या गाद्या करुन निवडणूक आयोगाने झोपा काढल्या का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

“गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री मेल्याशिवाय आता मढ्याला उपाव नाही” अशी सुरेश भटांची कविता आहे. राहुल नार्वेकर यांनी तसाच निर्णय घेतला आहे. गारद्यांच्या गर्दीत हे सामील झाले आहेत. ज्या महाराष्ट्रात रामशास्त्री जन्माला आले. घटना लिहिणारे बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले त्याच मातीत ही अवदसा जन्माला आली आहे. लोकशाहीचे हत्यारे जन्म घेत आहेत आणि त्यांना महाशक्ती साथ देते आहे. त्यांना माहीत नाही ही महाराष्ट्राची माती अशांना गाडून टाकते आणि संपवून टाकते. सगळा क्रम पाहिल्यानंतर जे काही पुरावे सादर केले ते सादर करणं आवश्यक होते असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray open challenge to eknath shinde rahul narvekar is to come without security on the ground and tell us who the shiv sena belongs to scj