Maharashtra Satta Sangharsh: सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर दिलेल्या निकालाचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. एकीकडे सत्ताधारी पक्षांकडून त्यांच्या बाजूने हा निकाल लागल्याचं म्हटलं जात आहे. दुसरीकडे ठाकरे गटाकडूनही हा निकाल त्यांच्या बाजूने लागल्याचं सांगितलं जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात काय निर्णय घेतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यादरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर आगपाखड केली आहे. तसेच, त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही योग्य तो निर्णय घेण्याचा इशाराच दिला आहे.
अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडेच!
सर्वोच्च न्यायालयाने काल दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालामध्ये १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे या आमदारांना अपात्र ठरवावं की नाही? यासंदर्भात आता राहुल नार्वेकरांच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. राहुल नार्वेकर सध्या लंडनमध्ये असून ते परत येताच यासंदर्भातल्या कारवाईला सुरुवात करणं अपेक्षित आहे.
मेलेला पोपट आणि न्यायालयाचा निर्णय!
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना सर्वोच्च न्यायालयासमोरील सुनावणीवर मेलेल्या पोपटाचं उदाहरण देऊन खोचक टिप्पणी केली आहे. “काल न्यायालयाने त्यांच्यासमोर जो पोपट ठेवलाय, तो हलत नाही, डोळे उघडत नाही वगैरे सांगून तो मेलाय हे जाहीर करण्याचं काम फक्त विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलंय. विधानसभा अध्यक्ष आधी आमच्याकडे होते. आता भाजपात आहे. त्यांना राजकीय प्रवासाची माहिती आहे. तो प्रवास कायद्याच्या चौकटीत राहून कसा करायचा हे चांगलं कळतं. संपूर्ण जगात महाराष्ट्राची अवहेलना चालली आहे. महाराष्ट्राची बदनामी थांबली पाहिजे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ऊ मुद्द्यांच्या आधारे जाणून घ्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल!
सत्ताधाऱ्यांना पुन्हा दिलं निवडणुकीचं आव्हान!
“काल जे घडलं, त्यावर अनेकजण त्यांच्या चष्म्यातून बघू शकतात. मेलेला पोपट हातात घेऊन मागून मिठूमिठू करणारी लोकं आहेत. तात्पुरतं जीवदान मिळालं आहे. मला वाटतं की महाराष्ट्राची ही अवहेलना थांबवायला पाहिजे . माझ्याप्रमाणेच नैतिकतेला जागून या बेकायदेशीर सरकारने राजीनामा द्यायला हवा. न्यायालयाने सगळी लक्तरं वेशीला टांगल्यानंतर आपण सगळे निवडणुकीला सामोरे जाऊया. लोकशाहीत शेवटचं न्यायालय जनतेचं असतं. आपण जनतेच्या न्यायालयात जायला काय हरकत आहे? आपण जनतेचा कौल स्वीकारू”, असं ते म्हणाले.
“..तेव्हा मात्र तोंड दाखवायला जागा राहणार नाही”
“अध्यक्ष त्यांच्या पद्धतीने निर्णय घेतीलच. त्यांनी उलट-सुलट काही केलं तर ज्याप्रमाणे आम्ही निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत, त्याचप्रमाणे जर इथे काही वेडंवाकडं झालं तर पुन्हा आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत. त्यानंतर जी काही बदनामी होईल, तेव्हा मात्र यांना जगात तोंड दाखवायला जागा राहणार नाहीत. आज तर विधानसभा अध्यक्ष परदेशात आहेत. त्यांनी लवकरात लवकर यावं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणे निर्णय घ्यावा”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्षांना इशारा दिला आहे.