ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या वर्धापन दिनी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला होता. आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी एक क्लिप ऐकवली होती. यामध्ये देवेंद्र फडणवीस कोविड लसीसंदर्भात विधान करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना ‘अर्धवटराव’ अशी उपमा देत खोचक टीका केली होती. त्यावर आता उद्धव ठाकरेंनीही प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर आपल्याच भाषणाचा एक व्हिडीओ ट्वीट केला होता. त्यावर “अर्धवटराव, मी काय म्हणालो होतो ते पूर्ण ऐकलंच नाही. असो. आता ऐका. याच अर्धवटपणामुळे तुम्हाला पानिपत शब्द अलिकडे अधिक आठवायला लागला आहे. म्हणून म्हणतो स्क्रिप्टरायटर बदला!” अशी पोस्टही देवेंद्र फडणवीसांनी केली होती. यावरून उद्धव ठाकरेंनी टोला लगावला आहे.

“१ जुलैला आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा, भ्रष्टाचाराचा जाब…” उद्धव ठाकरेंची घोषणा

“फडणवीस असं बोलतील यावर विश्वास बसत नव्हता”

देवेंद्र फडणवीस असं काही बोलू शकतात, यावर आपला विश्वासच बसत नव्हता, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी आज शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. “काल मी माझ्या भाषणात एक क्लिप ऐकवली. देवेंद्र फडणवीस असं बोलू शकतात यावर माझा विश्वास बसत नव्हता. ती क्लिप कुणी मॉर्फ्ड केली होती का? हे त्यांनी शोधावं. ते या क्लिपमध्ये म्हणतात की ‘मोदींनी लस तयार केली नसती तर?’ मोदींनी लस तयार केली? मला वाटत नाही की मोदी असं बोलले असतील. त्यावर ते मला अर्धवटराव म्हणाले”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“अर्धवटराव हे पात्र कुणाचं? रामदास पाध्ये, बोलका बाहुला. आता ते मला अर्धवटराव म्हणत असतील तर हे दिल्लीश्वरांचे आवडाबाई आहेत का? कारण पाध्येंची दोन पात्रं होती.. अर्धवटराव आणि आवडाबाई.. पण तेही दिसत नाही. आता ते नावडाबाई झाले आहेत. मोदींनी लस तयार केली या वाक्याला काही अर्थ आहे का? म्हणे पूर्ण क्लिप ऐकवली नाही, पण ते वाक्य तर आहे ना? ते नसते तर आपण कटोरा घेऊन बसलो असतो वगैरे.. कोणत्या जगात तुम्ही आहात? लोकांना मूर्ख का समजता?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना केला आहे.

“मी मुख्यमंत्री असताना एकरकमी चेक देऊन लस खरेदी करण्याची तयारी दाखवली होती. पण नाही दिल्या. पण आम्ही कधी केंद्रावर दोषारोप केलेले नाहीत. केंद्रानं पीपीई किट कुठून आणले? त्याची खरेदी कशी झाली? त्यात घोटाळा झाला का? रेमडेसिवीर कुठून आणली? टेंडर काढले होते का? हे कुठे आम्ही विचारतोय?” असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Live Updates
Story img Loader