लोकसभा निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा आणि टप्पे कधीही जाहीर होऊ शकतात. अशात प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत उद्धव ठाकरेंवर घराणेशाहीचा आरोप केला होता. त्यामध्ये अमित शाह असं म्हणाले होते की उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे. त्या विधानाचा आता उद्धव ठाकरेंनी जोरदार समाचार घेतला आहे. जय शाह याने सचिन आणि विराटला क्रिकेट शिकवलं आहे का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
अमित शाह यांनी काय म्हटलं होतं?
“इंडिया ही आघाडी वगैरे काही नाही. ही आघाडी म्हणजे काही सत्तालोलुप पक्षांचं एकत्र येणं आहे. या लोकांना आपल्या मुलांना, पुतण्याला, भाच्याला मुख्यमंत्री किंवा मंत्री किंवा पंतप्रधान बनवायचं आहे. राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत हे सोनिया गांधी यांचं लक्ष्य आहे. तर उद्धव ठाकरेंना त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं आहे. स्टॅलिन यांनाही त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं आहे. ममता बॅनर्जी यांना त्यांच्या भाचीला सत्तेत आणायचं आहे. यात आघाडी कुठे आहे? या लोकांना आपल्या कुटुंबाचं कल्याण करायचं आहे.”
उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांना काय दिलं उत्तर?
“अमित शाह तोंड वर करुन बोललात, उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे. बरं करायचं आहे मला मुख्यमंत्री. पण यांनी मतं दिली तर तो होईल ना. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद म्हणजे बीसीसीआयचं अध्यक्षपद नाही. अमित शाह महाराष्ट्रात येत आहेत. त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं जय शाहचं क्रिकेटमधलं योगदान काय? सचिन तेंडुलकरला, विराट कोहलीला त्याने शिकवलंय का? त्याचा काय संबंध आहे क्रिकेटशी? तुम्ही जे कराल ते सगळं चालतं. मात्र जनतेची पोरबाळं त्यांचं काय? त्यांना नोकऱ्या नाहीत, शिक्षण नाही, हाताला का नाही. तुम्ही तुमच्या मुलांचे चोचले पुरवत आहात. लोकांच्या मुलांनी काय करायचं? याचं उत्तर अमित शाह देतील का?” असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
गद्दारांची पोरटोरं यांना चालतात
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “शिवसेनेतून जे गद्दार तिकडे घेतले त्यांची पोरटोरं आणि त्यांची मस्ती यांना चालते. त्यांची घराणेशाही चालते. बाप मुख्यमंत्री आणि त्याचं कार्ट दुसरं काहीतरी ते चालतं. मोदींना अटलबिहारी वाजपेयी केराच्या टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला वाचवलं. त्या शिवसेना प्रमुखांच्या मुलांची घराणेशाही असं तुम्ही म्हणता आणि त्याला गद्दारी करुन खुर्चीवरुन खाली खेचता, हा माझा दोष आहे का?” असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी उरणच्या सभेत विचारला आहे.
हे पण वाचा- “उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे, म्हणून…”; अमित शाह यांचा गंभीर आरोप
आम्ही २५ ते ३० वर्षे भाजपाची पालखी वाहिली
आमचं आणि नाव चिन्ह तुम्ही सरळ गद्दारांना दिलं. चिन्ह द्यायचा अधिकार निवडणूक आयोगाला असेल पण नाव तुम्ही देऊ शकत नाही. ते नाव माझ्या वडिलांनी आणि आजोबांनी दिलं आहे. असं म्हणत पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरेंनी ललकारलं आहे. मी जिथे जातो तिथे जी हजारो लोक येत आहेत तेच सांगत आहेत खरी शिवसेना कुणाची? असंही उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही २५ ते ३० वर्षे भाजपाची पालखी वाहिली. पण ती पालखी आम्ही हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वसाठी आम्ही बरोबर होतो. असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.