शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर सभा घेत आहेत. उद्धव ठाकरे यांची आज जळगावमधील पाचोरा येथे जाहीर सभा सुरू आहे. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मांडले. अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारी मदत अद्याप मिळालेली नाही. याचा पुनरुच्चार ठाकरे यांनी यावेळी केला.
पाचोऱ्यातील सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी एका शेतकऱ्याने लिहिलेल्या कवितेच्या काही ओळी बोलून दाखवल्या. तसेच उद्धव ठाकरे म्हणाले की, मी या शेतकऱ्याला मी मंचावर आणणार होतो, परंतु आणलं नाही कारण, हे सरकार त्याच्यावर कारवाई करू शकतं. कारण या सरकारविरोधात किंवा जर कोणी खरं बोललं की हे सरकार त्याला तुरुंगात डांबू लागलं आहे.
उद्धव ठाकरेंनी मांडली शेतकऱ्याची व्यथा
झाल्या असतील तुमच्या वाऱ्या, तर या जरा आमच्या बांधावरती
अनाथांच्या नाथा झाल्या असतील तुमच्या वाऱ्या, तर या जरा आमच्या बांधावरती
तुमचं सगळं चाललं असेल ओकेमंधी पण आमच्या कापसाला भाव कधी?
हे ही वाचा >> “…त्यावेळी राऊत एकनाथ शिंदेंच्या पाया पडलेले”, संजय शिरसाटांचं वक्तव्य, म्हणाले, “जुगाडामुळे…”
शेतकऱ्यांचे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारीच्या ‘सामना’च्या (शिवसेनेच्या ठाकरे गटाचं मुख्यपत्र) अग्रलेखातूनही मांडले. “फडणवीस हे अकोल्याचे पालकमंत्री आहेत व अकोल्याची जनता एक-एक घोट पाण्यासाठी तडफडत आहे. खारे पाणी, जे विषारी आहे ते पिऊन दिवस ढकलत आहे. या पाण्यामुळे अनेक जण रोगाने बेजार झाले आहेत, पण पालकमंत्री फडणवीस टेबलावर फायलीचा डोंगर निर्माण करून सह्या करतानाचे स्वतःचे फोटो काढून घेत आहेत. अहो देवेंद्र महाशय, बाकीचे सोडा, पण त्या फायलींच्या ढिगाऱ्यात अकोला पाणीप्रश्नाची फाईल आहे काय? तेवढे काय ते बोला”, असा खोचक सवालही ठाकरे गटानं उपस्थित केला आहे.