शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यांनी काल (९ जुलै) यवतमाळ येथे पदाधिकाऱ्यांशी बोलताना भाजपावर जोरदार टीका केली. त्यापाठोपाठ त्यांनी आज (१० जुलै) दुपारी अमरावती येथे आयोजित केलेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलताना भाजपासह थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं. संध्याकाळी त्यांनी नागपुरात पक्षाच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री-गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, मी मघाशी एक गोष्ट ऐकली तेव्हा मला माझ्या कानांवर विश्वासच नाही बसला नाही. त्यामुळे मी अंबादास दानवेंना पुन्हा एकदा विचारलं, गहाण काय ठेवलं? तर ते म्हणाले, गावठी कट्टा. ते ऐकून मला धक्का बसला. कट्टा गहाण टाकला जातो.. आणि त्यावर पैसे दिले जातात. शेतकऱ्याला पैसे हवे असतील तर त्याची जमीन, घर किंवा पत्नीचं मंगळसूत्र गहाण टाकावं लागतं. पण इकडे गावठी कट्ट्यावर पैसे देणारी अवलाद गृहमंत्र्यांच्या गावात आहे. हे आपलं दुर्भाग्य आहे. आपल्याकडे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. तसेच गुन्हेगारी वाढलीय. हे गावठी कट्टा प्रकरण त्यातलंच एक उदाहरण.
हे ही वाचा >> धुळे येथे आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमावेळी फक्त शिवसेना आणि भाजपाचे झेंडे लावले होते.
उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी अमरावती येथील मेळाव्यात म्हटलं होतं की, “भाजपावाल्यांनी शिवसेना पक्ष चोरला, आज राष्ट्रवादी चोरली. उद्या आणखी काही चोरतील. भारतीय जनता पार्टीला सत्तेची मस्ती आली आहे. सत्ताधीश झाले तरी त्यांना धाकधूक वाटते की आपण परत निवडून येऊच शकत नाही. म्हणूनच मग ईडी लाव, सीबीआय लाव, पोलीस लाव असं त्यांचं सुरू आहे. विरोधकांना त्रास देण्यासाठी ईडी, सीबीआयचा वापर सुरू आहे. पोलिसांमार्फत नोटीसा दिल्या जात आहेत. तुम्ही मर्दाची अवलाद असाल तर सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा आणि मैदानात या”