सांगली : सांगलीत होत असणाऱ्या शिवसेनेच्या जनसंवाद मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगलीत दाखल होताच माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांच्या समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी वसंतदादांच्या स्नुषा व कॉंग्रेसचमधून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले विशाल पाटील यांच्या मातोश्री उपाध्यक्षा शैलजा पाटील यांच्याशी अवघ्या दोन मिनिटाचा संवाद साधला.
हेही वाचा >>> पंतप्रधान मोदींना औरंगजेबाची उपमा, मुख्यमंत्री शिंदेंचा संताप; म्हणाले, “ज्याने स्वतःच्या भावाला..”
यावेळी ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत, तेजस ठाकरे यांच्यासहित शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, मिरजेत होणाऱ्या जनसंवाद मेळाव्याची नियोजित वेळ सायंकाळी पाचची होती. मात्र सभास्थळी अपेक्षित गर्दी सहा वाजेपर्यंत झालेली नव्हती. गर्दीच्या प्रतिक्षेत जनसंवाद मेळाव्याची वेळ एक तास पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा सुरु होती. व्यासपीठावर महाविकास आघाडीचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. उमेदवारीच्या रस्सीखेचात कॉंग्रेसने हा ठाकरे शिवसेनेचा मेळावा असल्याचे कारण पुढे करुन बहिष्कार टाकला आहे. सभेसाठी पंढरपूर महामार्गालगत कोळेकर मठाचे मैदान निश्चित करण्यात आले असून ९ हजार चौरस फूटामध्ये ८ हजार खुर्च्यांची बैठक व्यवस्था आणि १६० चौरस फूटाचे व्यासपीठ उभारण्यात आले आहे.