Uddhav Thackeray आज ३ एप्रिल आहे आणि काल २ एप्रिल होती. अशी सुरुवात अशासाठी केली की आठवण होऊ नये म्हणून काल वक्फची चर्चा घडवली. अमेरिकेने भारताला सांगितलं होतं की कर कमी करावे नाहीतर आम्हीही कर लादू. याची सुरुवात झाली आहे याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून वक्फ विधेयक मांडलं गेलं असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.
आर्थिक संकटाबाबत देशाला विश्वासात घ्यायला हवं होतं
देशाला विश्वासात घेणं आवश्यक होती. आपल्याला काय पावलं उचलावी लागतील? परिणाम काय होतील याची चर्चा सरकारने करायला हवी होती. करोना काळात मी मुख्यमंत्री होतो. मोदीही तेव्हा घरी बसूनच काम करत होते. आमच्याशी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग केली होती. तसं काहीतरी करुन मोदींनी अमेरिकेच्या करांबाबत सांगितलं असतं तर आम्ही पाठिंबा दिला असता. अमेरिकेने आयात शुल्क लावलं हे कळू द्यायचं नाही म्हणून वक्फचा विषय आणला गेला.
ईदच्या पार्ट्या झोडून विधेयक आणलं गेलं-उद्धव ठाकरे
आजही अधिवेशन आहे. सगळे विषय बाजूला ठेवून देशाला त्यांनी शासकीय भाषेत आर्थिक संकटाबाबत अवगत केलं पाहिजे. नुकतीच ईद साजरी झाली. सगळ्या लोकांनी ईदच्या मेजवान्या झोडल्या आणि वक्फचं बिल मांडलं. किरण रिजेजू यांनी वक्फचं बिल मांडलं. किरण रिजेजू यांनी गोमांस खाण्याचं समर्थन केलं होतं. त्यांनीच हे बिल मांडलं हा एक योगायोग किंवा विलक्षण योगायोग होता.
भाजपाचं काय चाललंय कळतच नाही-उद्धव ठाकरे
भाजपाचं काय चाललंय कळत नाही. कधी सांगतात औरंगजेबाची कबर खोदा, यांचे लोक कुदळ, फावडी घेऊन जातात मग वरुन आदेश येतो की थांबा खोदू नका. मग परत माती टाकतात. मशिदीत घुसून मारणार सांगतात, मारायला गेलं की सांगायचं थांबा, सौगात ए मोदी घेऊन जा. लोकांना एकमेकांमध्ये लढवायचं आणि त्यावर आपल्या राजकारणाच्या पोळ्या भाजायच्या हे चाललं आहे. आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की भाजपाचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत. ३७० कलम काढलं गेलं तेव्हा आम्ही पाठिंबा दिला. हजारो कश्मिरी पंडीत निर्वासित झाले होते. त्यावेळी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना आसरा दिला. ३७० कलम काढून इतकी वर्षे झाली आहेत. काश्मिरी पंडितांना किती जमिनी परत मिळाल्या? हे आधी भाजपाच्या लोकांनी, गृहमंत्र्यांनी सांगावं. पाकव्याप्त काश्मीरबाबत काही भूमिका घेतलेली नाही. चीनच्या अतिक्रमाणबाबत कुणीही काही बोलत नाही.
भाजपाचा वक्फच्या जमिनींवर डोळा आहे-उद्धव ठाकरे
वक्फच्या जमिनी ताब्यात घेणार हे दिसतंय म्हणजेच यांचा जमिनींवर डोळा आहे. मोहम्मद अली जिना यांनाही लाजवेल अशी मुस्लिमांची बाजू अमित शाह यांच्यापासून सगळ्यांनी काल केली. देशाच्या इतिहासात मुस्लिम समाजाचा कळवळा आणणारी भाषणं सगळ्यांनी केली. हे बिल मुस्लिमांच्या बाजूने आहे की विरोधात आहे? जर बाजूने असेल तर मग तुम्ही हिंदुत्व सोडलं का? तुम्ही आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवू नका. १९९५ मध्ये सत्ता आली होती तेव्हा इस्तेमासाठी दिली होती, आज बरोबर तिच जागा तुम्ही बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या घशात घातली गेली आहे असाही आरोप उद्धव ठाकरेंनी केला. तसंच हे तुमचं हिंदुत्व आहे का? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला.