Uddhav Thackeray On Anil Deshmukh Allegation : उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब व अजित पवार यांच्याविरोधात खोटी प्रतिज्ञापत्रं सादर करण्याचा दबाव देवेंद्र फडणवीसांनी आपल्यावर आणल्याचा खळबळजनक दावा अनिल देशमुख यांनी केला होता. त्यावर देवेंद्र फडणवीसांनीही आपल्याकडे देशमुखांचे रेकॉर्डिंग असल्याचं प्रत्युत्तर दिलं होतं. यावरुन काही दिवसांपासून या दोघांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. यावर विविध राजकीय प्रतिक्रियादेखील उमटू लागल्या आहेत. दरम्यान, एकूणच याप्रकरणावर आता उद्धव ठाकरे यांनीही भाष्य केलं आहे.
उद्धव ठाकरेंनी आज त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना अनिल देशमुखांच्या आरोपाबाबत विचारण्यात आलं होते. यासंदर्भात बोलताना त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. आताचा भारतीय जनता पक्ष अतिशय घृणास्पद असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचा – Anil Deshmukh: देवेंद्र फडणवीसांना अनिल देशमुख यांचं पुन्हा आव्हान, “क्लिप्स असतील तर…”
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“अनिल देशमुख तीन वर्षांपूर्वी या विषयांवर बोलले होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्याशी भेट झाली, तेव्हा आमचं यावर बोलणं झालं. या आरोपांवरून कोणत्या पद्धतीचे घृणास्पद काम करणारी लोक सत्तेत बसली आहेत, हे लक्षात येईल. ही सर्व लोक अमानुष आहेत. ते कुणाचंही कुटुंब बघत नाही. दुसऱ्यांच्या मुलांवर घाणेरडे आरोप करून त्यांचे आयुष्य बरबाद करायचा प्रयत्न हे लोक करत आहेत. मात्र, त्यांनाही मुलंबाळं आहेत, हे ते विसरले आहेत. उद्या त्यांच्या मुलाबाळांवर कुणी असे आरोप केले, आणि घाणेरड्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना आईवडिलांचे दुखं काय असतं, हे कळेल”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.
भाजपावर सडकून टीका
पुढे बोलताना बोलताना त्यांनी भाजपावर टीका केली. “पूर्वीचा भारतीय जनता पक्षा वेगळा होता. आताचा भारतीय जनता पक्ष वेगळ आहे. आता भाजपा अतिशय घृणास्पद आणि अमानुष पद्धतीने काम करणारा आहे. मात्र, ही वृत्ती देशातून आणि महाराष्ट्रातून नष्ट झालीच पाहिजे”, असे ते म्हणाले.
नेमकं प्रकरण काय?
परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचा आरोप केला होता. त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. आणि अनिल देशमुख गृहमंत्री होते. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपातून मुक्तता हवी असेल आणि या प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणारी अटक टाळायची असेल तर तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे सुपुत्र व तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते अनिल परब आणि तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील आरोपांच्या शपथपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दबाब टाकला होता, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता. तसेच समित कदम नावाची व्यक्ती हे शपथपत्र घेऊन आला होता, असा दावाही देशमुखांनी केला होता.
अनिल देशमुखांच्या आरोपा देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिले होतं. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत ते काय बोलले याच्या ‘क्लिप्स’ माझ्याकडे आहेत. नाईलाजास्तव त्या बाहेर काढाव्या लागतील, असा इशारा फडणवीसांनी दिला होता.