आगामी २०२४ च्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने समान नागरी कायद्याचा नारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाच्या अनेक नेत्यांनी समान नागरी कायद्याचा पुनरूच्चार करून आगामी निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. यापार्श्वभूमीवर समान नागरी कायद्याबाबत अनेक पक्षांची भूमिका अनिश्चित असताना उद्धव ठाकरेंनीही याबाबत भाष्य केलं आहे. ‘आवाज कुणाचा’ या पॉडकास्ट माध्यमातून सामनाला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीत ते बोलत होते. संजय राऊतांनी त्यांची मुलाखत घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> “सध्याच्या सगळ्या भोंदूगिरीत या माणसाकडून…”, उद्धव ठाकरेंची अजित पवारांवर स्तुतीसुमनं

“२०२४ च्या निवडणुकांमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो समान नागरी कायदा”, असं संजय राऊत म्हणताच, “म्हणजे काय?” असा प्रतिसवाल उद्धव ठाकरेंनी राऊतांना विचारला. “लोकांनाही तोच प्रश्न पडलाय की म्हणजे काय? शिवसेनेची भूमिका काय असेल?” असा सवाल राऊतांनी केला.

“समान नागरी कायद्यावर आपण नंतर बोलूच. कारण त्याच्याबद्दल शिवसेनाप्रमुखांनी आपली भूमिका अत्यंत परखडपणे आणि स्पष्टपणे मांडली आहे. समान नागरी कायदा करत असाल तर पहिलं जे मी तुम्हाला सांगितलं तेच पुन्हा सांगेन. कश्मीर ते कन्याकुमारी गोवंश हत्याबंदी करून दाखवा. मणिपूरमध्ये शांतता राबवून दाखवा. तिकडे काही करू शकत नाही तुम्ही. आणि समान नागरी कायद्याचा अर्थ केवळ तुम्ही कुणाच्या लग्नापुरता ठेवणार असाल तर तो भाग वेगळा. पण कायद्यापुढे सगळे समान असतील तर तुमच्यातल्या भ्रष्टाचाऱ्यांनासुद्धा शिक्षा झालीच पाहिजे. मला वाटतं हा समान नागरी कायद्याचा अर्थ सर्वसामान्य जनतेला अभिप्रेत आहे. दुसरीकडे असला तर तो व्यभिचारी किंवा भ्रष्टाचारी. आणि त्यांच्याकडे असला की लगेच तो संत झाला लाँड्रीत जाऊन. हा समान नागरी कायदा होऊ शकत नाही”, अशी स्पष्ट भूमिका ठाकरेंनी मांडली.

हेही वाचा >> “राष्ट्रवादी एवढा भ्रष्टाचारी पक्ष आहे तर…”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, “ही कूटनीती…”

३७० कलम काढल्यानंतर टार्गेट किलिंग होतंय

“राममंदिराचा विषय आता जवळजवळ संपत आला आहे. ट्रिपल तलाकचा विषयसुद्धा संपला आहे. ३७० कलम आणि जम्मू-कश्मीर हा विषय संपला, पण अजूनही कश्मिरी पंडितांचा संपला नाही”, हा मुद्दा संजय राऊतांनी उपस्थित केला. त्यावर ठाकरे म्हणाले की, “तेच माझं म्हणणं आहे. ३७० कलम काढायला शिवसेनेने पाठिंबा दिला, पण हे कलम काढल्यानंतर अजूनही तिकडे टार्गेट किलिंग होतेय. कश्मिरी पंडित खोऱ्यात परत जाऊ शकत नाहीत. तिकडे जाऊन कोणी जमीन खरेदी करू शकत नाहीत. निवडणुका होत नाहीयत. कश्मीरचे तसे तुकडे केले आहेत. लेह, लडाख वेगळा काढला. जम्मू वेगळा केला, मग आता निवडणुका का घेत नाही तुम्ही?” असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.

मग आता कश्मिरात निवडणुका का होत नाहीत?

“जेव्हा मेहबुबा मुफ्तीवरून मध्यंतरी भरपूर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. (INDIA च्या) पहिल्या मीटिंगमध्ये मीच त्यांच्या बाजूला जाऊन बसलो होतो, पण भाजपही त्यांच्यासोबत सत्तेत बसले होते ना! तेव्हा फडणवीस म्हणाले होते की, त्यावेळी अतिरेक्यांनी धमकी दिली होती, तुम्ही कश्मीरला निवडणुका कशा घेता ते पाहू. घेऊन दाखवा. म्हणून आम्ही निवडणुका घेऊन दाखवल्या. सरकार कसे स्थापन करता ते बघतो, अशी धमकी अतिरेक्यांनी दिली तेव्हा आम्ही मेहबुबाबरोबर गेलो व सरकार बनवलं. तेव्हा पाकिस्तानने धमकी दिली म्हणून निवडणुका घेऊन दाखवल्या. मग आता कश्मिरात निवडणुका का होत नाहीत? आता मेहबुबांबद्दल बोलताय, त्या तर तुमच्यासोबत पण होत्याच ना. आता परिस्थिती अशी आहे, भारत-पाक क्रिकेट सामनाच अहमदाबादेत होतोय. म्हणजे पाकिस्तानसोबत सुद्धा तुमची मैत्री झाली असेल”, असंही ठाकरे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray reaction on uniform civil code to be imposed by central government sgk
Show comments