आज उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या पदाधिकारी मेळाव्यात शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपावर आणि शिंदे गटावर कडाडून टीका केली. फोडाफोडीचं राजकारण हे भाजपाच करते आहे. तसंच आम्ही ३० वर्षे तुमच्या बरोबर राहिलो ते उगाचच राहिलो असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच भाजपावर टीका करताना त्यांनी सुरेश भटांच्या ओळीही वाचल्या आहेत.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. तुमची जन्म कुंडली मांडा. तुमच्या पत्रिकेत राहु केतू असतील कारण तुमचा गुरु चांगला नाही. आज मलाही थोडा पश्चात्ताप होतो आहे कारण त्यावेळी शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्व आणि भगव्यासाठी आपण एकत्र झालो होतो. पण हे भगव्यामध्ये भेद करणारे नालायक आहेत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. हे लोक भगव्यामध्ये दुही माजवत आहेत. जय श्रीराम म्हणून काय होणार आहे? तशी घोषणा करणार असाल त्या रामासारखं वागा असंही उद्धव ठाकरे म्हणाले. मी आज मुद्दामहून संजय राऊत यांच्या ओळी वाचून दाखवतो आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरेंनी कुठल्या ओळी वाचल्या आहेत?
हे असे आहेत तरीपण हे असे असणार नाही
दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही
हे खरं आहे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके
पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही
तुम्ही जिवंत आहात, जागरुक आहात. तुम्हाला लढायचं कसं ते शिकवावं लागणार नाहीत. औरंगजेब म्हणाला होता की मराठ्यांना पराक्रम शिकवावा लागत नाही. इथे गवताला भाले फुटतात. आता गरज आहे ती त्याच्या पुढच्या वाक्याची. भाजपा जे करतं आहे ते महाराष्ट्रात खडकावर दुहीचं बीज फेकलं तर ते मोठ्या प्रमाणावर फोफावतं. आज भाजपाची हीच नीती आहे. मात्र भाजपाची जी नीती आहे ती तोडा फोडा आणि राज्य कराची आहे. ही नीती इंग्रजांची आहे. श्यामाप्रसाद मुखर्जींनी मुस्लीम लिग बरोबर सरकार स्थापन केलं होतं. त्यावेळी चले जाव चळवळ चिरडण्यासाठी पत्र दिलं होतं. हिंदुत्व काय आहे ते आम्हाला शिकवू नका. आम्ही छत्रपती शिवरायांचे भक्त आहोत, भवानी मातेचे आहोत असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.