शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, उद्धव ठाकरे यांनी काल (९ जुलै) यवतमाळ येथे पदाधिकाऱ्यांशी बोलताना भाजपावर हल्लाबोल केला होता, तर त्यांनी आज (१० जुलै) अमरावती येथे आयोजित केलेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलताना भाजपासह थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं. तसेच भाजपाकडून सातत्याने होणाऱ्या ‘घरी बसणारा मुख्यमंत्री’ या टीकेलाही उत्तर दिलं. उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्यावर सातत्याने एक टीका होते की मी घरी बसून होतो. होय मी घरी बसून होतो पण मी कधी कुणाची घरं फोडली नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमरावतीमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे म्हणाले, मर्दाची औलाद असाल तर ईडी आणि सीबीआयसारख्या सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा आणि मैदानात या. राजकारणातले नामर्द तुम्ही… तुमचे दोन खासदार होते तेव्हा शिवसैनिकांनी तुम्हाला खांद्यावर बसवून हा महराष्ट्र फिरवून दाखवला. हे भूत (भाजपा) मानेवर बसवून सगळीकडे फिरवलं. परंतु आज तुम्ही आम्हाला राजकारणातून संपवायला निघालात? हेच का तुमचं हिदुत्व? हिच तुमची नीतीमत्ता आणि हिच तुमची वृत्ती!

उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून म्हणाले, मला एक गोष्ट कळत नाही. जे तुमच्या बरोबर राहिले, आम्ही २५ वर्ष तुमच्याबरोबर राहिलो, त्या शिवसेनेला तुम्ही संपवायला निघालात. तुम्ही अगदी शून्य होता, तेव्हा बाळासाहेबांनी (शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे) तुम्हाला वाचवलं. नाहीतर अटल बिहारी वाजपेयी यांनी (भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपाचं वरिष्ठ नेतृत्त्व) तुम्हाला तेव्हाच कचऱ्यात टाकलं होतं. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ही एकमेव व्यक्ती होती, जी तुमच्या पाठिशी उभी होती. आत्ताच्या या पंतप्रधानांच्या पाठिशी हा एकमेव माणूस उभा राहिला. तेव्हा बाळासाहेब यांच्या पाठिशी नसते तर आज हे (नरेंद्र मोदी) जगातल्या सर्वोत्तम पंतप्रधानांच्या यादीत असते का? हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारायला हवा.

हे ही वाचा >> “तिसरा उपमुख्यमंत्री आणि दोन मुख्यमंत्री करता येणार नाहीत”, गिरीश महाजनांचं सूचक वक्तव्य

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना २००२ साली तिथे मोठ्या दंगली पेटल्या होत्या. जगभरातील लोकांनी, वृत्तपत्रांनी थेट नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरलं होतं. भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनीदेखील मोदींच्या कार्यप्रणालीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. उद्धव ठाकरे यांनी आज त्याच गोष्टीची आठवण करून दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray reminds narendra modi bal thackeray once saved you asc