Uddhav Thackeray on Narendra Modi Maharashtra Daura: नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्यातून शिवसेनेतील ठाकरे गट व शिंदे गट यांनी एकमेकांवर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं. उद्धव ठाकरेंनीही आपल्या भाषणातून एकनाथ शिंदे व भाजपाच्या राज्यातील नेतेमंडळांबरोबरच मोदी सरकारवरही टीका केली. मनोज जरांगे पाटलांचं बेमुदत उपोषण व मराठा आरक्षणाचा मुद्दा यावरून विरोधकांसह जरांगे पाटलांनीही सरकारवर हल्लाबोल केला असताना या पार्श्वभूमीवर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्ताने ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक विनंती केली आहे.
निळवंडे धरणाचं लोकार्पण
उत्तर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचं लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याचं नियोजन करण्यात आलं. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारच्या सुमारास शिर्डीत दाखल झाले. यावेळी इतर कार्यक्रमांबरोबरच मोदींच्या उपस्थितीत एका शेतकरी मेळाव्याचंही आयोजन करण्यात आलं. यावेळी मोदींसमवेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते.
पंतप्रधान आज शिर्डी दौऱ्यावर; निळवंडे धरणासह विविध विकासकामांचे लोकार्पण
दरम्यान, मोदींच्या या दौऱ्याविषयी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना विचारणा केली असता त्यांनी मोदींना एक विनंती केली आहे. आज मातोश्रीवर झालेल्या एका पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उद्धव ठाकरे उत्तर देत होते. “पंतप्रधान महाराष्ट्रात येत आहेत तर त्यांचं स्वागत आहे. त्यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा विषय सोडवावा ही माझी त्यांना विनंती आहे”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच, “मराठा आरक्षणावर खूप लोकांनी बोलून गोंधळ घालू नये”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
“राजकारणाचा खेळखंडोबा झालाय”
दरम्यान, ठाकरे गटात होणाऱ्या इनकमिंगविषयी विचारणा केली असता उद्धव ठाकरेंनी सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं. “आमच्या पक्षातून बाहेर जाणारे सत्तेच्या दिशेनं जात आहेत तर पक्षात येणारे सत्ता आणण्याच्या दिशेनं येत आहेत. काल एकनाथ पवार भाजपामधून आले, आज चंगेज खान आले. येत्या काही दिवसांत आणखी काही जण येतील. राजकारणाचा झालेला खेळखंडोबा कुणालाही पटत नसल्यामुळेच ते येत आहेत”, असं उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.