BJP म्हणजे भेकड जनता पार्टी आहे अशी टीका आज उद्धव ठाकरे यांनी केली आहे. नाशिकमध्ये आज पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर कडाडून टीका केली आहे. मंदिराच्या उद्घाटनासाठी रामनवमी पर्यंत थांबला असतात तर काही बिघडलं नसतं असंही उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच राम मंदिरासाठी आणि कलम ३७० हटवण्यासाठी आम्ही भाजपाला पाठिंबा दिलाच होता हे मी जाहीरपणे सांगतो आहे. असंही आपल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“राम मंदिरासाठी आणि काश्मीरचं ३७० कलम काढण्यासाठी आम्ही तुम्हाला (भाजपा) पाठिंबा दिला होता. हिंदूंवरचे अत्याचार कमी होण्यासाठीही आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला होता. पण जेव्हा कठीण काळ होता तेव्हा शिवसेनेची सोबत तुम्हाला लागली. अटलबिहारी वाजपेयी यांना जेव्हा केराच्या टोपलीत टाकायला निघाले तेव्हा शिवसेनाप्रमुख तुमच्या मदतीला धावले. ती शिवसेना आज तुम्ही संपवायला निघाला आहात? हे तुमचं हिंदुत्व आहे? संपवायचं असेल तर मैदानात या. आम्ही मैदानात आहोत. मात्र स्वतः कडेकोट बंदोबस्तात राहणार. आमचं कवच काढून घेणार पण मी त्यांना सांगतो आज माझ्यासमोर आहे ते आमचं कवच आहे काढून घ्या. पोलीस, निमलष्करी दल, बॉम्ब जॅमर इतकं सगळं करुन तुम्ही ५६ इंची छाती दाखवणार का? माझ्या शेतकऱ्याची हडकुळी छाती तुम्हाला भारी पडणार आहे.”

हे पण वाचा- “उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही…”, सुरेश भटांच्या ओळी वाचत उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका

भाजपाकडे कार्यकर्तेच नाहीत

“भारतीय जनता पक्षाकडे कार्यकर्तेच नाहीत. शिवसेना ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे कारण मी वारसा घेऊन पुढे चाललो आहे. मात्र भाजपाचे लोक म्हणजे दंगल झाली की पळणारी अवलाद. आमच्या नेत्यांवर, शिवसैनिकांच्या घरी ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स यांच्या धाडी पडतात. घर आमच्या कार्यकर्त्याचं तिथे हे लोक पाय पसरुन बसतात. येऊ दे आमची सत्ता तुमच्या तंगड्या तुमच्या गळ्यात घालतो की नाही बघा” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी इशाराही दिला आहे.

BJP म्हणजे भेकड जनता पार्टी

“एका बाजूला स्वतः शासकीय यंत्रणेच्या बंदबस्तात राहणार. बीजेपी म्हणजे भेकड जनता पार्टी नाव ठेवा. ही भेकडांची पार्टी आहे. भाकड तर आहातच पण भेकडही आहात. नेता कुणीही देऊ शकत नाही, कार्यकर्तेही नाहीत. आम्ही हिंदू आहोत असं सांगता, असे भेकड हिंदू आजपर्यंत देशात झाले नाहीत आणि होणारही नाहीत. हे कुठलं हिंदुत्व आहे. मधे मोर्चे काढले होते हिंदू जनाक्रोश. तिकडे तुमचे विश्वगुरु बसलेले असताना हिंदूंना आक्रोश करण्याची वेळ असेल तर त्यांनी खुर्ची सोडून द्यावी. सहन होत नाही आणि सांगता येत नाही म्हणून गप्प बसता येणार नाही. आत्ता महाराष्ट्रात मोदींच्या वाऱ्या वाढल्या आहेत. कधी काळा राम मंदिरात, कधी इकडे, कधी तिकडे. या काहीच प्रश्न नाही. हा महाराष्ट्राच तुम्हाला धडा शिकवणार आहे.” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray sabha he slams bjp is in his speech said bjp is like wolf scj