मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शिंदे गटाने आता थेट निवणूक आयोगाकडे धाव घेत आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. याची दखल घेत निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष संघटनेतील बहुमत येत्या ८ ऑगस्टपर्यंत कागदोपत्री सिद्ध करा, असे निर्देश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाला लक्ष्य केले आहे. हिंमत असेल तर माझ्या वडिलांचा फोटो न लावता निवडणूक लढवा. हे बंडखोरी नव्हे तर हरामखोरी आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. ते मुंबईत शिवसैनिकांना संबोधित करत होते.

हेही वाचा >>> Goa Illegal Bar Row : “लेखी माफी मागा” स्मृती इराणींची काँग्रेससह तीन नेत्यांना नोटीस

“त्यांना शिवसेनेला संपवायचे आहे. पण ठाकरे आणि शिवसेना हे नाते घट्ट राहणार. तुमच्या कित्येक पिढ्या उतरल्या तरी त्यांना पाताळात गाडून आम्ही येऊ. त्यांना शिवसेना आणि ठाकरे हे नाते तोडायचे आहे. ही बंडखोरी नाही. ही हरामखोरी आहे. हा नमकहरामीपणा आहे. एवढीच मर्दुमकी असेल तर माझ्या वडिलांचा म्हणजेच शिवसेनाप्रमुखांचा फोटो लावू नका. हिंमत असेल तर स्वत:च्या नावाने मतं मागा,” असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला दिले.

हेही वाचा >>> “छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत, अवमान सहन करणार नाही.” ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विनोद पाटलांचा इशारा

“तुम्हाला वडील चोरायचे आहेत. पक्षही चोरायला निघाले आहात. तुम्ही कसले मर्द आहात. अशा लोकांच्या हातात महाराष्ट्र, मुंबई आणि तुमचे आयुष्ये देणार आहात का? न्यायालयात खटला सुरु आहे. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. त्यांनी आम्हीच खरी शिवसेना आहोत असे निवडणूक आयोगाला सांगितले आहे. पण हे सगळं कारस्थान आहे, त्याला जल्लोषाने उत्तर देऊन चालणार नाही. मला प्रत्येक पदाधिकाऱ्याचे शपथपत्र हवे आहे. माझ्यासह गटप्रमुखाचे शपथपत्र पाहिजे,” असेदेखील उद्धव ठाकरे शिवसैनिकांना उद्देशून म्हणाले.

Story img Loader