काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. सावरकर यांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली, असा आरोप त्यांनी केली आहे. राहुल गांधी यांच्या याच विधानामुळे संताप व्यक्त केला जात आहे. राज्यात उद्धव ठाकरे गट काँग्रेस यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या रुपात एकत्र आहे. याच कारणामुळे राहुल गांधींच्या विधानावर माजी मुख्यमंत्र्यांची काय भूमिका आहे, असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी राहुल गांधी यांच्या मताशी सहमत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ते आज (१७ नोव्हेंबर) मुंबईत शिवाजी पार्क परिसरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
हेही वाचा >>> “सगळंच आपल्या बुडाखाली घ्यायचं हाच…”, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला; शिंदे गटालाही केलं लक्ष्य!
“राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केले त्याच्याशी आम्ही सहमत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आमच्या मनात अतिव प्रेम, निष्ठा, आदर आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी त्याग केला. हालअपेष्टा सोसल्या. तेच स्वातंत्र्य अबाधित राखण्याची आता गरज आहे,” असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
“राहुल गांधी सावरकरांबद्दल काही बोलले की आम्हाला प्रश्न विचारले जातात. मग ते पीडीपीसोबत मांडीला मांडी लावून बसले होते. ते काय देशप्रेम होते का? मी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला होता. मुफ्ती मोहम्मद सईद भारत माता की जय म्हणतात का? त्या वंदे मातरम् म्हणतात का? ते भाजपाला कसे चालते,” असा प्रश्नदेखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
“लोकांना संभ्रमित करू नये. स्वातंत्र्यवीर तसेच त्यांच्यासोबत अनेक क्रांतीवीरांनी बलिदान देत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. मात्र तेच स्वातंत्र्य आता धोक्यात येत आहे. आपल्या देशाची गुलमगिरीकडे वाटचाल होत आहे. देशाचे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी एकत्र यायलाच हवे,” असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.