Uddhav Thackeray : सहदेव पेटकर यांनी आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थिती शिवबंधन हाती बांधलं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. त्यांनी सहदेव पेटकर यांचे आभार मानले. तसंच शिवसेना एकच आहे, दुसरा पक्ष म्हणजे एसंशि आहे असा पुनरुच्चार करत एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. तसंच आत्ताचं सरकार थापा मारुन आलं आहे लोकांना आता खरी आपल्या शिवसेनेची गरज आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

सहदेव पेटकर आज इतक्या जोरात बोलले आहेत की मला काही बोलायची आवश्यकता वाटत नाही. दत्ता यांचं कौतुक करतो कारण ते वाढदिवस असतानाही इथे आले. दत्तांसारखे अनेक शिवसैनिक आहेत जे शिवसेना वाढवण्यासाठी मेहनत करत आहेत. कोकणात एक पाऊल टाका असं मला सांगण्यात आलं पण मी सांगतो एकच पाऊल टाकणार नाही पुन्हा एकदा कोकण पादाक्रांत करेन. कोण मधे येतो बघू. कुणी कसा विजय मिळवला याच्या सुरस कथा बाहेर येऊ लागल्या आहेत. कोकणात या हे जसं तुम्ही सांगत आहात तसा अख्खा महाराष्ट्र, माझे शिवसैनिक, शेतकरी बांधव सगेळ सांगत आहेत की आम्ही फसवलो गेलो. थापा मारुन हे मोकळे झाले आहेत. आत्ता लोकांना आपली खरी गरज आहे. असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

एसंशिला लोकच म्हणत आहेत..चल शी-उद्धव ठाकरे

लोकांना कल्पना आहे दिलेला शब्द पाळणारा एकच पक्ष राज्यात आहे आणि तो म्हणजे शिवसेना, दुसरे कोण आहेत? एसंशि. लोकच म्हणत आहेत चल शी. शेंडा नाही बुडखा नाही अशी गेलेली माणसं आहेत. गेलात, मोठे झालात ठीक आहे पण तुम्हाला ज्यांनी मोठं केलं ती सगळी साधी माणसं माझ्यासोबत आहेत. त्यामुळे मला चिंता नाही. येत्या १६ एप्रिलला नाशिकला शिबीर घेण्यासाठी जातो आहे. सुट्ट्या संपल्या की माझा सलग दौरा मी तळ कोकणापर्यंत करणार आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. आज तुम्ही (सहदेव पेटकर) मगाशी म्हणालात की स्थानिक पातळीवर काही कुरबुरी झाल्या, त्या झाल्या असतील तरीही ठीक आहे. पण आपलं घर सोडायचं नसतं हे लक्षात ठेवा. आपल्या घरातले गद्दार होते त्यांच्यात आणि तुमच्यात फरक आहे कारण तुम्ही निष्ठेने राहिलात. जे जात आहेत त्यांच्या लेखी आपल्याकडे काही नसेल. माझ्याकडे तुम्ही सगळे आहेत ही गोष्ट माझ्यासाठी मोठी आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच कोकणातला एकही कोपरा असा सोडायचा जिथे भगवा फडकणार नाही हे लक्षात ठेवा असंही उद्धव ठाकरे म्हणाले.