निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना हे पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. त्यांनी आज (१८ फेब्रवारी) मुंबईत शक्तीप्रदर्शन केले. यावेळी त्यांनी भर रस्त्यात कारमधूनच कार्यकर्त्यांना संबोधित केले. तसेच यावेळी त्यांनी चोरांनी धनुष्यबाण, शिवसेना हे नाव चोरले आहे. मात्र शिवसेना पक्ष संपणार नाही, असे म्हणत भाजपा, शिंदे गटावर टीका केली. तसेच यावेळी त्यांनी स्वायत्त संस्था मोदी सरकारच्या गुलाम आहेत. कटकारस्थान रचून राजकारण केले जात आहे. कदाचित आपले मशाल हे निवडणूक चिन्हदेखील जाऊ शकते, असे सूचक विधान केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> उद्धव ठाकरेंचे एकनाथ शिंदेंना खुले आव्हान, ‘मशाल’ चिन्हाचा उल्लेख करत म्हणाले; “मर्द असाल तर…”

मधमाशीचा डंख त्यांना अद्याप लागलेला नाही

“आज धनुष्यबाण, शिवसेना हे नाव चोरलं गेलं आहे. मात्र ज्यांची चोरलंय त्यांना हे माहिती नाही की त्यांनी मधमाशांच्या पोळीवर दगड मारला आहे. त्यांनी आतापर्यंत मधमाशांनी जमवलेल्या मधाचा शोध घेतलेला आहे. मधमाशीचा डंख त्यांना अद्याप लागलेला नाही. मात्र आता ती वेळ आली आहे,” असे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे तसेच बंडखोर आमदारांना उद्देशून म्हणाले.

तुमच्या कितीजरी पिढ्या उतरल्या तरी…

“असा कोणताही पक्ष नसेल ज्याच्यावर गेल्या ७५ वर्षांच्या लोकशाहीवर हा आघात झाला असेल. भारतीय जनता पार्टी तसेच पंतप्रधानांना वाटत असेल की शिवसेना पक्ष संपवता येईल. मात्र तुमच्या कितीजरी पिढ्या उतरल्या तरी शिवसेना संपणार नाही,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >>> निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “उद्धव ठाकरेंचा…”

शिवसेना कोणाची हे महाराष्ट्राच्या मालकांनी…

“निवडणूक आयुक्तांनी गुलामी केली आहे. निवृत्त झाल्यानंतर ते कुठलेतरी राज्यपाल होऊ शकतील. कारण आताच एक न्यायमूर्ती राज्यपाल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाने असे गुलाम अवतीभोवती ठेवलेले आहेत. शिवसेना कोणाची हे महाराष्ट्राच्या मालकांनी ठरवण्याची वेळ आली आहे,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी तसेच भाजपावर केली.

कदाचित ते आपली मशाल…

“यांना ठाकरे नाव हवे. बाळासाहेब ठाकरेंचा चेहरा हवा. मात्र शिवसेनेचे कुटुंब नको आहे. आपलं शिवसेना हे नाव चोराला दिलं गेलं. आपला पवित्र धनुष्यबाण चोराला दिला गेला. कटकारस्थानाने हे राजकारण करत आहेत. कदाचित ते आपली मशाल ही निशाणीदेखील काढू शकतील,” असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले.

हेही वाचा >>> ‘निवडणूक आयोगाने गंभीर चूक केली,’ कायदेतज्ज्ञ उल्हास बापटांचे मोठे विधान; म्हणाले, “हा निर्णय…”

उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला निवडणुकीत उतरण्याचे आव्हान दिले. “माझे आव्हान आहे की, ज्यांनी धनुष्यबाण चोरला ते मर्द असतील तर, त्यांनी चोरलेलं धनुष्यबाण घेऊन निवडणुकीत यावं. मी मशाल घेऊन उभा राहतो. पाहू कायं होतं,” असे खुले आव्हानही उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray said symbol of flaming torch also may taken out from thackeray group prd
Show comments