मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता राज्यात शिंदे गट आणि भाजपाचे संयुक्त सरकार स्थापन झाले आहे. या सत्ताबदलानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर युती सरकारमध्ये पाच वर्षे मुख्यमंत्रिपद भूषवलेले देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली. याच सत्ताबदलावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. अडीच वर्षांपूर्वी मी हेच बोंबलत सांगत होतो. तेव्हा हे स्वीकारले असते तर भाजपाच्या एखाद्या दगडाला शेंदूर लागला असता, अशी खरमरीत टीका उद्धव ठाकरेंनी केली. ते मुंबईत शिवसैनिकांना संबोधित करत होते.
हेही वाचा >>>Goa Illegal Bar Row : “लेखी माफी मागा” स्मृती इराणींची काँग्रेससह तीन नेत्यांना नोटीस
“आम्ही शिवसैनिक मुख्यमंत्री केला, असे आज सांगितले जात आहे. हेच मी अडीच वर्षांपूर्वी बोंबलून सांगत होतो. हे अडीच वर्षांपूवी केलं असतं तर सगळं सन्मानाने झालं असतं. पाच वर्षांमधील अडीच वर्षात भाजपाच्या एका दगडला शेंदूर (मुख्यमंत्रिपद) लागला असता. आज तुमच्या मनावर एवढा दगड पडला आहे, तर तेव्हाच हे का नाही केलं,” असा खरमरीत सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपाला केला.
हेही वाचा >>> “मला पुष्पगुच्छ नको पण…” निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना मागितल्या महत्त्वाच्या ‘दोन गोष्टी’
“अगोदर जागा ५० टक्के आणि सत्तेचा वाटा ५० टक्के असं ठरलं होतं. पण आपल्याला जागा कमी दिल्या. जागा दिल्या तिकडे बंडखोरी केली गेली. अनेक जागा पाडल्या गेल्या. त्यानंतर असं काही ठरलेलंच नव्हतं असं सांगितलं गेलं. मग अता कसे झाले,” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपाला केला.
हेही वाचा >>> “वडील आणि पक्ष चोरायला निघाले, तुम्ही मर्द नव्हे तर दरोडेखोर” उद्धव ठाकरेंनी केले शिंदे गटाला लक्ष्य
“बिकाऊ असणारे सगळे गेले आहेत. आता त्यांनी वेगवेगळ्या एजन्सीज कामाला लावल्या आहेत. त्यांच्याकडे पैसा अमाप आहे. ही लढाई पैसा विरुद्ध निष्ठा अशी आहे. ही साधी माणसं माझे वैभव आहे. तुम्ही कितीही पैसा ओतलात तरी हे वैभव त्याला पुरुन उरल्याशिवाय राहणार नाही,” असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा >>>“छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत, अवमान सहन करणार नाही.” ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विनोद पाटलांचा इशारा
“त्यांना शिवसेनेला संपवायचे आहे. पण ठाकरे आणि शिवसेना हे नाते घट्ट राहणार. तुमच्या कित्येक पिढ्या उतरल्या तरी त्यांना पाताळात गाडून आम्ही येऊ. त्यांना शिवसेना आणि ठाकरे हे नाते तोडायचे आहे. ही बंडखोरी नाही. ही हरामखोरी आहे. हा नमकहरामीपणा आहे. एवढीच मर्दुमकी असेल तर माझ्या वडिलांचा म्हणजेच शिवसेनाप्रमुखांचा फोटो लावू नका. हिंमत असेल तर स्वत:च्या नावाने मतं मागा,” असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला दिले.