बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीतर्फे आज बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कामाचा आढावा देण्यात आला. शिवतीर्थाजवळील महापौर बंगल्यात राज्य शासनातर्फे हे स्मारक उभारले जात आहे. एमएमआरडीएला या प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी यंत्रणा म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे. या स्मारकाचे पहिल्या टप्प्यातील ५८ टक्के बांधकाम पूर्ण झालेले आहे. या स्मारकामध्ये नेमके काय असेल, याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे. असे असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या स्मारकाच्या बांधकामाला वेळ लागण्यामागचं कारण सांगितलं आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे.
हेही वाचा >>>कधीही न पाहिलेले फोटो, कार्टुन्स अन् बरंच काही, बाळासाहेबांचं जीवनपट उलगडणारं मुंबईतील स्मारक नेमकं कसं असेल?
“अनेकजण मला विचारतात की इथे पुतळा कुठे असेल. मी त्यांना सांगतो की येथे पुतळाच नसेल. पुतळा म्हणजे स्मारक नाही. बाळासाहेबांचे फोटो आणून लावले. त्यांनी काढलेले कार्टून आणून ठेवले, त्यांच्या वस्तू आणून ठेवल्या म्हणजे संग्रहालय होतं. हे संग्रहालय म्हणजे स्फूर्तीस्थान असणार आहे. हे संग्रहालय म्हणजे प्रेरणा देणारे स्थान असणारे आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचा >>>“…तो हमने भी जख्म नही गिने” राजकारणाची लढाई मैदानात लढा म्हणत छगन भुजबळांची टोलेबाजी
“काही लोकांना वाटते की स्मारकासाठी वेळ लागत आहे. जेथे स्मारक होत आहे तो महापौर यांचा बंगला आहे. हा बंगला एक वारसा वास्तू आहे. वारसा वास्तूंसाठी काही नियम असतात. वारसा वास्तूच्या मध्ये (लाईन ऑफ साईट) एकही बांधकाम येता कामा नये, असा नियम आहे. या वास्तूला धक्का पोहोचणार नाही, याची आम्ही काळजी घेत आहोत. बांधकामासाठी जागा आहे. मात्र सीआरझेडचाही कायदा आहे. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून आपण प्रेरणास्थानासाठी जमिनीखाली जागा उपलब्ध केली आहे. या स्मारकाच्या बाजूला समुद्र आहे. समुद्राचा रेटा खूप जास्त आहे. समुद्राच्या पाण्यापासून, पाण्याच्या दबापासून संरक्षण व्हावे, हे लक्षात घेऊनच बांधकाम करावे लागत आहे. संग्रहालयाला काही धोका पोहोचणार नाही, याचाही विचार करावा लागत आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.
हेही वाचा >>> “सरन्यायाधीशांची ओळख होती म्हटलं की..,” उदय लळीत यांच्या सत्कार समारंभात फडणवीसांचे विधान!
बांधकाम केल्यानंतर लोकांना येण्याजाण्याचा मार्ग सहज असायला हवा. याचाही विचार केला जात आहे. शिवसेना प्रमुख राज्यभर फिरले. त्यांनी ठिकठिकाणी सभा घेतल्या. अनेक पत्रकारांनी त्यांच्या दौऱ्याचे वृत्तांकन केलेले आहे. अनेकांकडे बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो, सुरुवातीच्या काळातील मोर्चे, सीमा आंदोलन, दसरा मेळाव्यातील भाषणं आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची बरीच भाषण आपल्याकडे आहेत. मात्र यातील काही भाषणं आपल्याकडे नाहीत. दसरा मेळाव्यातील काही भाषणं आपल्याकडे नाहीयेत. तेव्हा रेकॉर्डिंक करणे कठीण होते. बाळासाहेबांची सर्व भाषणं मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.