निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का आहे. या निर्णयानंतर ठाकरे गटाची आगामी रणनीती काय असेल, असा प्रश्न विचारला जात होता. दरम्यान, या प्रश्नाचे उत्तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. आम्ही निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत

“१०० कौरव एकत्र आले म्हणून पांडव कधी हरले नव्हते. नेहमीच सत्याचा विजय होत आला आहे. पुढेही सत्याचाच विजय होईल. अनेकांना हा अन्याय मान्य नाही. सध्या लोकशाहीवर अत्याचार होत आहे. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, अंध धृतराष्टाचा नाही. तो आपल्या डोळ्यांसमोर लोकशाहीचे वस्रहरण कदापि खपवून घेणार नाही. या निर्णयाच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. सर्वोच्च न्यायालयात याचा निकाल लागेलच, अशी आम्हाला खात्री आहे,” असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.

हा कट असल्याचे उघडपणे दिसत आहे

“सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेचा खटला सुरू आहे. सोळा बंडखोर आमदार अपात्र होणार असे घटनातज्ज्ञांचे मत आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे सांगितले होते की द्या ब्रेकिंग न्यूज. धनुष्यबाण शिंदे गटालाच मिळणार असे, ते म्हणाले होते. मग हा एक कट आहे का. हा उघड कट असल्याचे दिसत आहे. मात्र या कटामध्ये केवढ्या मोठ्या पातळीवरचे लोक सामील झालेली आहेत, हेसुद्धा आता जनतेला समजत आहे,” असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.

दरम्यान, ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे संकेत दिल्यामुळे शिवसेना पक्ष तसेच धनुष्यबाणाच्या स्वामित्वाचा लढा अद्याप संपलेला नसल्याचे दिसत आहे. आगामी काळात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले तर न्यायालय याबाबत काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray said will move to supreme court against election commission decision about bow and arrow and shiv sena party prd
Show comments