शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. शिवसेना ( शिंदे गट ) खासदार राहुल शेवाळे यांनी हा मानहानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी मंगळवारी न्यायालयात ( २१ ऑगस्ट ) सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर केला आहे.
उद्धव ठाकरे दूरदृष्यप्रणालीद्वारे तर संजय राऊत प्रत्यक्षरित्या न्यायालयात हजर राहिले होते. तेव्हा, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी शेवाळे यांचे आरोप मान्य नसल्याचं न्यायालयात सांगितलं. न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर केला. पुढील सुनावणी १४ सप्टेंबरला होणार आहे.
हेही वाचा : “लोकसभेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा आम्ही प्रचार करू, पण…”, ठाकरे गटातील नेत्याचं मोठं विधान
प्रकरण काय?
२९ डिसेंबर २०२२ ला ‘सामना’च्या हिंदी आणि मराठी आवृत्तीत राहुल शेवाळे यांच्याबद्दल एक बातमी प्रसिद्ध झाली होती. राहुल शेवाळे यांची दुबईतील कन्स्ट्रक्शन कंपनीत गुंतवणूक असल्याचं त्या मथळ्यात लिहिलं होतं. या बातमीमुळे आपली बदनामी झाल्याचा आरोप करत राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता.