अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा १२ फेब्रुवारीला दिला आहे. महाराष्ट्रात काँग्रेससाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातो आहे. अशोक चव्हाण १५ फेब्रुवारीला भाजपात प्रवेश करतील आणि त्यांना भाजपाकडून राज्यसभेवर पाठवण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जाते आहे. अशोक चव्हाण यांनी स्वतः भाजपात जाण्याबाबत काहीही सांगितलेलं नाही. मला भाजपाची कार्यप्रणाली माहीत नाही त्यामुळे मी माझी भूमिका दोन दिवसांत स्पष्ट करेन इतकंच विधान त्यांनी केलं आहे. या सगळ्या घडामोडी घडताना कन्नडच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“अशोक चव्हाण इतक्या लवकर तिकडे जातील असं वाटलं नव्हतं. काल-परवा पर्यंत नीट बोलत होते. त्यामुळे असंच वाटणार, ते तिकडे गेले पण कपाळावर शिक्का काय लागणार? गद्दार! मग आयुष्याची कमाई काय? इतकं सगळं मिळवलंत पण गद्दारीत सगळं गमावलंत. अशोकराव तुम्ही तिकडे गेलात म्हणून तुमच्यावर लगेच आरोप करणार नाही. पण तुम्ही घोडचूक केली आहे जी तुम्हाला आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांना भोगावी लागणार आहे. महाराष्ट्र दिल्लीशाहीची जी हुकूमशाही सुरु आहे त्याविरोधात तडफेने उभा आहे. हिंदू आमच्याबरोबर आहेत पण मुस्लिम बांधवही आहेत. हे सगळे का येत आहात? माझा पक्ष चोरला, चिन्ह गद्दारांना दिलं आहे. माझे हात रिकामे आहेत. तरीही इतकी गर्दी होते आहे ही माझी संपत्ती आहे. त्यांच्याकडे भेकडांची सेना आणि गद्दारांची सेना आहे. पण तुमची भाड्याची फौज आमच्या मर्दांशी टक्कर देऊ शकत नाही.”

हे पण वाचा- ‘राहुल गांधींच्या पाठीत खंजीर खुपसला’, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर काँग्रेस नेत्याची टीका

देवेंद्र फडणवीसांना टोला

“भाजपाने फक्त द्वेष पेरला आहे. विचार पेरलेले नाहीत. आदर्श दिलेले नाहीत. त्यामुळे आदर्श घोटाळा करणाऱ्या अशोक चव्हाणांना बरोबर घेतलं आहे. मित्राला दगा द्यायचा. जी शिवसेना २५ ते ३० वर्षे तुमच्याबरोबर होती त्या शिवसेनेला तुम्ही फोडलंत. खुर्चीसाठी फोडाफोडी सुरु आहे. अशोक चव्हाण हे लीडर नाहीत तर डीलर आहेत असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी त्यांचीशी आता डील केलं.” असंही म्हणत उद्धव ठाकरेंनी टोला लगावला आहे.

मोदीजींनी भारतरत्नाचा बाजार मांडला

उद्धव ठाकरे यांनी १५ दिवसांत पाच जणांना भारतरत्न जाहीर केलेल्या पीएम मोदींवर सडकून टीका केली. ते म्हणाले की,  मोदीजींनी भारतरत्नाचा बाजार मांडला आहे. त्या त्या राज्यात दिलं, तर तिथली मतं मिळतील. स्वामीनाथन यांना भारतरत्न दिला याचा अभिमान आहे, पण त्यांच्या आयोगाच्या शिफारशी का लागू करत नाहीत? अशी विचारणा त्यांनी केली. स्वामीनाथन शिफारशी लागू केल्यास आम्ही तुमचा सत्कार करू. असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray says devendra fadnavis who says ashok chavan is not a leader but a dealer made a deal with him scj