शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यभरातील शिवसैनिकांशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणामध्ये आपण स्वत: कमी पडल्याची कबुली पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना केली. मी सुद्धा गुन्हेगार असल्याचा उल्लेख करताना उद्धव ठाकरेंनी २५ वर्ष युतीत सडल्याचाही उल्लेख पुन्हा एकदा केल्याचं पहायला मिळालं. तसेच आता कार्यकर्त्यांनी मार्चमधील निवडणुकांसाठी तयार रहावे असंही मुख्यमंत्री म्हणाले.
शिवसेना इतर पक्षांप्रमाणे स्थानिक निवडणुका गांभीर्याने घेत नसल्याची खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. “आपलं खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी असं असतं. लोकसभा जेवढ्या जिकरीने लढवतो तेवढ्या जिकरीने या निवडणुका आपण लढवत नाही. माझ्यासह जे मंत्री आहेत, जिल्हाप्रमुख आहेत ते या निवडणुकांकडे ज्या पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे तसं देतात का?,” असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
नक्की वाचा >> “…तर आज देशात शिवसेनेचा पंतप्रधान असता”; बाळासाहेबांचा संदर्भ देत संजय राऊतांचं वक्तव्य
“मी पण तसं पाहिलं तर गुन्हेगार आहे. मी तरी कुठे फिरलो. या वेळेचा भाग वेगळा होता. पण आपल्या एखाद दुसऱ्या नेत्याने सोडलं तर कोणी लक्ष दिलेलं असेल असं वाटत नाही. हे यापुढे टाळलं पाहिजे. गेल्या दोन वर्षांत दोन विधानपरिषदा आपल्या आपण हारलो आहोत. त्या कशा हरलो?,” असा प्रश्न उद्धव यांनी शिवसैनिकांना विचारला.
नक्की वाचा >> “…तर नाय मातीत गाडलं, लोळवलं तर शिवसेना आपलं नाव सांगणार नाही”; शिवसेनेचं भाजपाला थेट आव्हान
“काही जण सांगतात की तुमच्यातच गद्दार निघाले. जसं शिवसेना प्रमुख म्हणायचे आईचं दूध विकणारी औलाद आपल्यात आहे, असं माझं मत नाही. असेल तर त्याने बिनधानस्तपणे शिवसेना सोडावी. बघून घेऊ आम्ही. जे शिवसैनिक कट्टर आहेत त्या शिवसैनिकांच्या मदतीने, मग ते मूठभर राहिले तरी चालेल. त्या मूठभर शिवसैनिकांच्या मदतीने त्यांच्या मूठीमध्ये अभिमानाची आणि स्वाभीमानाची तलावर देऊन जिंकून दाखवल्याशिवाय राहणार नाही, या जिद्दीने मी मैदानात उतरलोय,” असं उद्धव ठाकरे यांनी भाषणादरम्यान म्हटलं आहे.