लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. मात्र एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी उद्धव ठाकरेंविषयी मवाळ भूमिका घेतली होती. उद्धव ठाकरे हे माझे मित्र असून “मी त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांना मदत करण्यासाठी सर्वात आधी हजर असेन” असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. मोदींच्या या वक्तव्यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया समोर आल्या. मोदींच्या या वक्तव्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंसाठी एनडीएचे दरवाजे उघडल्याची चर्चा सुरू झाली होती. यावर आता उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, “मोदींच्या अडचणीच्या काळातही मी सर्वात आधी धावून जाईन.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नरेंद्र मोदी म्हणाले होते की “उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत आणि माझे त्यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत. ते आजारी असताना मी नेहमी त्यांना फोन करायचो. वहिनींना (उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे) फोन करून उद्धव ठाकरेंच्या तब्येतीची अधून मधून विचारपूस करायचो. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्यांनी मला विचारलं होतं की तुम्ही काय सल्ला द्याल? त्यावर मी त्यांना म्हटलं होतं की सर्वात आधी उपचार करून घ्या, इतर चिंता सोडा, आधी शरीर जपा. बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मी नेहमी त्यांचा सन्मान केला आहे आणि यापुढेही करत राहीन. उद्धव ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत. उद्या त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांना सर्वात आधी मदत करणारा मीच असेन. परंतु, हे सगळं कुटुंब म्हणून… आमचे राजकीय मार्ग मात्र आता वेगळे आहेत. कुटुंब म्हणून मी त्यांच्याबरोबर असेन.”

मोदींच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, “नरेंद्र मोदींचं हेच वक्तव्य त्यांना पुन्हा एकदा दाखवायला हवं, ऐकवायला हवं. कारण आता ते मला नकली संतान म्हणत आहेत. त्यांची ही अशी वक्तव्ये ऐकून मी त्यांना आणि या सरकारला गजनी सरकार म्हणतो. कारण २०१४ च्या निवडणुकीत ते जे काही म्हणाले होते. ते त्यांना २०१९ च्या निवडणुकीत बिलकुल आठवत नव्हतं. २०१९ च्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी ज्या घोषणा केल्या त्या २०२४ च्या निवडणुकीमध्ये ते विसरले. काल जे काही म्हणाले ते आज विसरतात. आज जे काही बोलतात ते उद्या विसरतील, अशी त्यांची परिस्थिती आहे त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर मी काय प्रतिक्रिया देऊ असा प्रश्न पडला आहे.” उद्धव ठाकरे टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

हे ही वाचा >> “राज ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख होण्याची शक्यता”, प्रकाश आंबेडकरांचा दावा; वेळही सांगितली, “शिवशक्ती-भीमशक्तीबाबत म्हणाले…”

उद्धव ठाकरे म्हणाले, “हाच व्हिडिओ मोदी यांना पुन्हा एकदा दाखवायला हवा. ते कधी काय बोलताहेत, कुठे भाषण करतायत, याचं त्यांना बिलकुल भान नाही. ते गेल्या आठवड्यात तेलंगणामध्ये म्हणाले, उद्धव ठाकरे नकली संतान आहे. माझा आणि तेलंगणाचा काय संबंध? मला वाटतं मोदींना जो कोणी भाषणं लिहून देतो त्याला त्याचं मानधन मिळालेलं नाही. कदाचित तो संपावर गेला असेल. त्यामुळे मोदी भाषणांमध्ये अशी वक्तव्ये करत आहेत. मोदी हे बऱ्याचदा लिहून आणलेली भाषणं टेलिप्रॉम्प्टरच्या सहाय्याने वाचून दाखवतात तुम्हाला (टीव्ही ९) दिलेल्या मुलाखतीत कदाचित त्यांच्यासमोर टेलिप्रॉम्प्टर नसेल म्हणून त्यांनी असं वक्तव्य केलं असावं. उद्या नरेंद्र मोदींना काही झालं तर मी देखील त्यांच्यासाठी धावून जाईन. त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्यासाठी उभा राहीन. कारण हीच माणुसकी आहे आणि हेच आमचं हिंदुत्व आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray says i will help narendra modi in his trouble asc
Show comments