मागील तीन दिवसांमध्ये काश्मीरमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले आहेत. भाविकांच्या बसवरही अतिरेक्यांनी हलला केला. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत अनेकांचा बळी गेला आहे. काश्मीरमधील सध्याची स्थिती पाहता देशाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांवरून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदींच्या सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच ठाकरे म्हणाले, मोदींना काश्मीर सांभाळता येत नसेल तर त्यांना पंतप्रधानपदावर बसण्याचा अधिकार नाही. उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वी त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी मणिपूरमधील स्थितीवरूनही मोदींवर हल्लाबोल केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्धव ठाकरे म्हणाले, जम्मू काश्मीरमध्ये तीन दिवसांत तीन दहशतवादी हल्ले झाले, ही कोणाची जबाबदारी आहे? ते ‘अब की बार’वाले लोक आता कुठे गेले आहेत? देशात शांतता ठेवण्याची जबाबदारी कोणाची आहे? देशात सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत, मणिपूर जळतंय आणि हे लोक (सत्ताधारी) तिकडे फिरकत नाहीत. मणिूपरच्या विषयावर काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी भाष्य केलं. मणिपूर जळतंय हे एक वर्षाने का होईना त्यांनाही दिसलं. वर्षभराने ते यावर बोलले. आता तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह तिकडे जाणार की नाहीत?

ठाकरे गटाचे प्रमुख म्हणाले, “या लोकांनी (नरेंद्र मोदी आणि एनडीए) निवडणुकीत काश्मीरबाबत प्रचार केला. कलम ३७० हटवल्याचा ढोल बडवला, मात्र तिथलं सत्य काय आहे ते आम्ही जनतेसमोर ठेवलं आहे. त्यावर हे लोक काहीच बोलणार नाहीत. काश्मीरमधील कलम ३७० काढल्यानंतर तिथे काही फरक पडला का? तिकडे लोकांचे जीव जात आहेत. मात्र सत्ताधारी स्वतःचा ढोल वाजवण्यात व्यस्त आहेत, तिसऱ्यांदा सरकार बनवल्याची जाहिरात करण्यात व्यस्त आहेत. मात्र, देशात तीन दिवसांत तीन दहशतवादी हल्ले झाले याला जबाबदार कोण? आताही मोदी काश्मीरला जाणार नाहीत का? खरंतर ते केवळ विरोधकांना संपवण्यात व्यस्त आहेत.”

हे ही वाचा >> विधान परिषदेच्या जागांवरून महाविकास आघाडीत बिघाडी? उद्धव ठाकरे म्हणाले, “काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी…”

उद्धव ठाकरे म्हणाले, मोदींना देश सांभाळता येत नसेल तर त्यांना पंतप्रधानपदावर बसण्याचा अधिकार नाही. दुसरीकडे मणिपूरबाबत वर्षभराने का होईना मोहन भागवत बोलले ते काही कमी नाही. मणिपूरच्या झळा अखेर त्यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचल्या. त्यांची संदेशवाहक यंत्रणा इतकी कुचकामी असेल, असे संदेश पोहोचायला एक वर्ष लागत असेल तर ती आता सुधारावी लागेल. मोहन भागवत जे काही बोलले ते पंतप्रधान मोदी गांभीर्याने घेणार का? निवडणूक प्रचाराच्या शेवटी भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले, ‘आम्हाला आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नाही. आम्ही भाजपा म्हणून समर्थ आहोत.’ खरंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भाजपाचा पाया मानलं जातं. मात्र आता त्यांना संघाचीही गरज वाटत नाही. मोहन भागवत यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने मणिपूरची व्यथा मांडल्यावर पंतप्रधान आणि गृहमंत्री मणिपूरला जाणार की नाही? असा प्रश्न पडला आहे. काश्मीर पुन्हा पेटलं आहे. मात्र भाजपावाले प्रचाराचा ढोल वाजवत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray says if narendra modi cant manage kashmir has no right to be prime minister asc
Show comments