जालन्यात उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला झाल्यानंतर या घटनेचे राज्यभर पडसाद उमटू लागले आहेत. अशातच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपोषणाच्या ठिकाणी जाऊन आंदोलक मराठा बांधवांची आणि लाठीहल्ल्यात जखमी झालेल्या पीडितांची भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी थेट राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राज्य सरकारला जालन्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम घ्यायचा आहे. परंतु, त्या कार्यक्रमादरम्यान या उपोषणाची अडगळ नको म्हणून हे राज्यकर्ते आंदोलकांना हुसकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, राज्य सरकारला काही काम नाही म्हणून शासन आपल्या दारी असा कार्यक्रम ते घेत आहेत. येत्या काही दिवसात तुमच्या इथे (जालन्यात) हा कार्यक्रम त्यांना करायचा होता. म्हणून तुम्हाला जबरदस्तीने इथून उठवायला निघाले आहेत. त्यांच्या कार्यक्रमात ही अडगळ त्यांना नको होती म्हणून तुम्हाला हुसकावून लावायला निघाले आहेत.
उद्धव ठाकरे राज्य सरकारला उद्देशून म्हणाले, अरे ही जबरदस्ती कशाला करताय? येऊन बोला ना यांच्याशी, भेटा ना यांना. मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा यांना भेटत होतो. बऱ्याचदा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भेटत होतो. आमच्या सरकारमधील मंत्री भेटत होते. अशोक चव्हाण आंदोलकांना भेटत होते. आज आम्ही कोणीच नाही, तरी माणूसकीच्या नात्याने विचारपूस करायला इथे आलोय.
उद्धव ठाकरे म्हणाले, मी जालन्याला यायला निघालो तेव्हा आम्हाला मुबईत निरोप आला की तिकडे वातावरण तंग आहे. लोक गाड्या पेटवत आहेत. मी म्हटलं तिथे जाऊन बघू, तिथे माझे बांधवच आहेत. त्यांचा माझ्यावर विश्वास नसेल तर ते देतील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. मी इथे येऊ शकतो तर मग ते दोघं-तिघंजण (मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री) का नाही आले?
हे ही वाचा >> Elections 2023 : निवडणुकीआधी भाजपाला मोठा धक्का, आजी-माजी आमदारांसह १० नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
“संसदेत मराठा आरक्षणाचा निर्णय घेऊन दाखवा”
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ज्याप्रमाणे दिल्ली सरकारचे सगळे अधिकार तुम्ही (मोदी सरकार) काढून घेतले. सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊनही संसदेत तो विषय तुम्ही पुन्हा आणलात. त्यानंतर तुमच्या पाशवी बहुमताच्या जोरावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय उलटा फिरवलात. आता संसदेत तसाच निर्णय घेऊन मराठा, ओबीसी, धनगर आणि इतर समाजांना न्याय द्या. जे समाज न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत त्या सर्वांना या अधिवेशनात न्याय द्या.