महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन गेल्या आठवड्यात (सोमवार, १७ जुलै) सुरू झालं आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी (१९ जुलै) विधान भवन परिसरात आले होते. यावेळी यांनी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली. या भेटीबद्दल विचारल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले होते की, त्यांनी चांगलं काम करावं अशा शुभेच्छा मी त्यांना दिल्या आहेत. तसेच, पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, या परिस्थितीत शेतकरी आणि राज्यातल्या नागरिकांकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका अशी विनंतीही मी अजित पवार यांना केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, या भेटीवर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कौतुकही केलं आहे. उद्धव ठाकरे यांची एक मुलाखत प्रसारित करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे खासदार आणि ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्राचे संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीच्या पहिल्या भागात उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

या मुलाखतीवेळी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना अजित पवारांबरोबरच्या भेटीबद्दल विचारल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, अडीच वर्ष ते आमच्याबरोबर होते. या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहिला. तसेच त्यांच्याकडे तेव्हा आणि आत्ताही अर्थखातं देण्यात आलं आहे. मी त्यांना एवढंच सांगितलं की, सत्तेच्या साठमारीत राज्याला आणि राज्यातील जनतेला विसरू नका.

ज्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार दिवसांपूर्वी (अजित पवारांच्या महायुतीतल्या प्रवेशाआधी) ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले, त्यांच्याकडेच राज्याच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या आहेत. मग ते आरोप खरे की अजित पवार खरे? असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.

हे ही वाचा >> “राष्ट्रवादी एवढा भ्रष्टाचारी पक्ष आहे तर…”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, “ही कूटनीती…”

उद्धव ठाकरे म्हणाले, अजित पवार हा व्यवस्थित चौकटीत काम करणारा माणूस आहे. प्रशासन आणि त्यांचं खातं त्यांनी व्यवस्थित सांभाळलं होतं. यांच्या (भाजपा) या सगळ्या भोंदूगिरीमध्ये या माणसाकडून (अजित पवार) काही झालं तर पाहावं म्हणून मी त्यांची भेट घेतली. नाहीतर आता कधीही निवडणुका होऊ शकतात.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray says maharashtra has expectations from ajit pawar asc
Show comments