Uddhav Thackeray Saint Gadge baba : महाविकास आघाडीने प्रचार सभांचा धडाका उडवला आहे. महायुतीचं असलेलं आव्हान मोडून काढण्यासाठी जमेल तितक्या मतदारसंघात पक्षनेतृत्त्व पोहोचत आहेत. शिवसेना (उध्दव ठाकरे) यांनीही महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली असून विविध मतदारसंघ पालथे घातले आहेत. आज ते सांगलो विधानसभेचे अधिकृत उमेदवार दीपक आबाब पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोला येथे गेले होते. तेथे त्यांनी प्रबोधनकार ठाकरे आणि संत गाडगे महाराज यांच्यामधील एक किस्सा सांगितला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संत गाडगेबाबा यांचं चरित्र माझ्या आजोबांनी (प्रबोधनकार ठाकरे) यांनी लिहिल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. ते पुढे म्हणाले, “माझा तेव्हा जन्मही झाला नव्हता आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तेव्हा ऐन तारुण्यात होते. त्यावेळी गाडगेबाबा आमच्या घरी यायचे. पण आजोबा नेहमी सांगायचे की ते घरी आले की आत येऊन सोफ्यावर बसायचे नाहीत. घरी आले की दरवाजाबाहेर बसायचे. माझ्या माँ ला हाक मारायचे. अगं सुनबाई काहीतरी भाकर तुकडा असेल तर दे, असं म्हणायचे. मग त्या म्हणायच्या की आत या. तर ते म्हणायचे मी बाहेरच ठीक आहे. तेवढ्यात माझ्या माँ काहीतरी बनवायला घ्यायच्या. तर ते म्हणायचे आता नको बनवू. तुझ्याकडे काही शिळं-पाकं असेल तर दे. त्यावर माँ म्हणायच्या, तुम्हाला शिळं कसं देणार? तर ते म्हणायचे, मला तेच पाहिजे. मग घरात काही असेल तर माँ त्यांना द्यायची. घराबाहेर झाडं होती, त्याखाली बसून ते खायचे”, असा प्रसंग उद्धव ठाकरेंनी सांगितला.

हेही वाचा >> “गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!

गाडगेबाबांची माणुसकीची शिकवण होती

त्यांनी पुढे सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधला. ते म्हणाले, गाडगेबाबांनी दशसूत्री सांगितली होती. भुकेलेल्या अन्न द्यायचं, तहानलेल्या पाणी द्यायचं, बेरोजगाराला नोकरी द्यायची, तरुण-तरुणींची लग्ने लावायची. केवढी मोठी गोष्ट संतांना सांगितली. कोण होते गाडगेबाबा? उमदेवार होते? पण ही माणुसकीची शिकवण होती. परंतु, ही शिकवत आता विसरायला लागले आहेत. धर्माधर्मात मारामाऱ्या केल्या जात आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शहाजी बापू पाटलांवर निशाणा

“मी गद्दारांच्या छाताड्यांवर पुन्हा भगवा गाडायला आहे. महाराष्ट्राचा इतिहास आहे. महाराष्ट्र कधीही गद्दारांना क्षमा करत नाही. मला गद्दारांना सांगायचं की त्यांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, पण त्यांनी रायगडावरचं टकमक टोक बघितलं नाही. ते त्यांना २३ तारखेला दाखवायचं आहे”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केली. रेल्वेत कुणाची ओळख असेल तर त्यांनी मला २३ तारखेचं गुवाहाटीचं तिकीट काढून द्यावं, कारण एकाला तिकडे पाठवायचं आहे. मग त्यांनी तिथे झाडं मोजत बसावं. असे टोलाही त्यांनी लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray says saint gadge baba used to come his home before his birth sgk