भाजपला महाराष्ट्रात चेहरा नाही म्हणणारे उद्धव व राज ठाकरे हे घराणेशाहीचे चेहरे आहेत. राज्यात भाजप १५० पेक्षा अधिक जागांवर स्वबळावर निवडणुकीत विजय संपादन करणार असल्याचे काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना टीका करीत आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांना भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भयगंड झाल्याने टीका करीत असल्याचे गोवा राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. गोवा मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर कोकणची जबाबदारीही असून त्यांनी मुंबई व पुण्यानंतर सावंतवाडीत राजन तेली यांच्या प्रचारार्थ आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते.
या वेळी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, उमेदवार राजन तेली, गोवा आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, राम काणेकर, मंदार कल्याणकर, अॅड्. सिद्धार्थ भांबुरे, मनोज नाईक आदी उपस्थित होते.
काँग्रेस व राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र करण्याची लोकांनी हमी घेतली आहे. त्यामुळे भाजप स्वबळावर सत्तेत येईल. त्यात कोकणचा मोठा वाटा असेल, असे पर्रिकर म्हणाले. कोकणात जेथे भाजप नव्हती तेथे उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे कोकणासह राज्यात भाजपला १५० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळणार आहे, असे मनोहर पर्रिकर म्हणाले.
या निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेच्या सोबतीची गरज नाही. गेल्या पाच वर्षांच्या देशातील राज्याच्या निवडणुका पाहता दिल्ली वगळता प्रत्येक राज्यात पक्षांना स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे राज्यात भाजप स्वबळावर येईल. भाजपने उमेदवार कोण हे पाहण्यापेक्षा भाजपला विजय दृष्टिक्षेपात ठेवला आहे, असे मनोहर पर्रिकर म्हणाले.
भाजपकडे राज्यात चेहरा नाही, असे म्हणणाऱ्या अजित पवार व पृथ्वीराज चव्हाण यांनी एलबीटी सत्ता काळात रद्द कशासाठी केला नाही, तसेच उद्धव व राज ठाकरे हे चेहरे घराणेशाहीचे आहेत, असे मनोहर पर्रिकर
म्हणाले. भाजपची राज्यातील ताकद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा पाहून भाजपवर टीका होत आहे. त्यामुळे भाजपची ताकद वाढत आहे. हेच टीकेचे द्योतक आहे, असे सांगताना युती तोडण्याचे क्रेडिट खासदार संजय राऊत यांना द्यायला हवे, असे मनोहर पर्रिकर म्हणाले.
महाराष्ट्र राज्य एकसंध राहणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. मुंबईपासून महाराष्ट्र तोडण्याचा प्रश्नच नाही, असे सांगताना मनोहर पर्रिकर म्हणाले, गोवा राज्यात ४० लाख पर्यटक येतात, त्यात वाढ होऊन ७० लाख यावेत म्हणून गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ करणार आहोत. हेच पर्यटक सिंधुदुर्गात येऊ शकतात त्यासाठी पायाभूत सुविधा आणि गुंतवणूकदार हवेत, असे मनोहर पर्रिकर म्हणाले.
सावंतवाडी शहर वगळता समुद्रकिनारी सोयीसुविधा नाहीत, असे सांगून मनोहर पर्रिकर म्हणाले, पर्यटनात गुंतवणूकदार यायला तयार आहेत, पण या भागातील राजकीय नेतृत्व पार्टनरशिप मागत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार येत नाहीत या निवडणुकीतून राजकीय दहशत बाजूला टाकण्याची संधी लोकांना मिळाली आहे, असे मनोहर पर्रिकर म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशाच्या संरक्षणाची काळजी आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत सीमेचा प्रश्न सोडविण्याची टीका करणे योग्य नाही. केंद्र सरकार संरक्षणाबाबत कडक धोरण अवलंबिले आहे, असे मनोहर पर्रिकर म्हणाले.
केंद्रात मोदींना पंधरा वर्षे सत्ता करायची आहे त्यामुळे त्यांची ध्येय धोरणांवर टीका होतच राहणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीने पंधरा वर्षे महाराष्ट्र लुटला असून एलबीटीसारख्या प्रश्नावर आंदोलन होऊनही अजित पवार व पृथ्वीराज चव्हाण यांनी निर्णय घेतला नाही तेच आता सरकार आल्यावर निर्णय घेणार म्हणत असल्याचे मनोहर पर्रिकर म्हणाले.
उद्धव यांना मोदींचा भयगंड – मनोहर पर्रिकर
भाजपला महाराष्ट्रात चेहरा नाही म्हणणारे उद्धव व राज ठाकरे हे घराणेशाहीचे चेहरे आहेत. राज्यात भाजप १५० पेक्षा अधिक जागांवर स्वबळावर निवडणुकीत विजय संपादन करणार असल्याचे काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना टीका करीत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-10-2014 at 07:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray scared to modi manohar parrikar