केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ या नावासह ‘धनुष्यबाण’ हे चिन्हंही गोठवण्याचा हंगामी निर्णय शनिवारी दिला. ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंधेरी-पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हा निर्णय लागू असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर आता शिवसेनेकडून तीन चिन्ह आणि तीन नावांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे देण्यात आला आहे. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी माहिती दिली आहे.
उद्धव ठाकरेंनी राज्यातील शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं, “त्रिशुळ, मशाल आणि उगवत्या सूर्याच्या चिन्हाचा पर्याय निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे. त्याचसोबत ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, ‘शिवसेना प्रबोधनकार ठाकरे’ आणि ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ अशी तीन नावेही निवडणूक आयोगाला सुचवण्यात आली आहेत,” असे उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
हेही वाचा – “आता मात्र अती झालं”, उद्धव ठाकरेंचं शिंदे गटावर टीकास्र
“निवडणूक आयोगाने निपक्षपातीपणाने राहिलं पाहिजे. शनिवारी शिवसेनेकडून नावे आणि चिन्हे सादर केली आहेत. अंधेरीची पोटनिवडणूक लागली असून, चार दिवसांत अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर एक चिन्ह आणि एक नाव द्या. निवडणूक आयोगाने शिवसेनेने दिलेली तीन चिन्ह आणि तीन नावे जनतेला सांगितली आहेत. मात्र, शिंदे गटाने काय सादर केलं, याची माहिती दिली नाही,” असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.