सोमवारी अर्थात २० जून रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपानं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. आपले सर्व उमेदवार जिंकून आणणं मविआसाठी बहुमत सिद्ध करण्यासारखीच लढाई ठरली आहे. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपा या चारही पक्षांनी आपापल्या आमदारांना आणि उमेदवारांना मुंबईत वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये ठेवलं आहे. त्यांच्याशी चर्चा आणि खलबतं सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या ५६व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदार आणि इतर पदाधिकाऱ्यांशी मुंबईतल्या वेस्टइन हॉटेलमध्ये संवाद साधला. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी देखील सांगितल्या.
“माझा पक्षच पितृपक्ष”
आपल्याकडे पितृपक्षाबद्दल गैरसमज आहेत असं सांगतानाच आपला पक्ष पितृपक्षच असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. “माझा पक्ष तर पितृपक्षच आहे. कारण माझ्या पित्यानंच हा पक्ष स्थापन केला आहे. शिवसेना पक्षप्रमुखपदाची सूत्र हाती घेतली, तेव्हा शिवसेना स्थापनेचा क्षण माझ्या डोळ्यांसमोरून तरळून गेला. तेव्हा वन बीएचकेमध्ये माझे आजोबा, मासाहेब, त्यांची ३ मुलं, काका, त्यांचं कुटुंब हे सगळे होते. आज त्या क्षणाचे प्रत्यक्ष साक्षीदार मी आणि आमच्या कुटुंबातले काही सोडले तर अजून कुणी नाहीत. माझं वय तेव्हा जेमतेम ६ वर्षांचं होतं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
सुभाष देसाई, रावतेंच्या आडून शिवसैनिकांना साद?
दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ शिवसेना नेते सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांचं कौतुक करतानाच शिवसैनिकांना अप्रत्यक्ष साद घातल्याचं बोललं जात आहे. “सुभाष देसाई आणि दिवाकर रावते या दोघांना मी विधानपरिषदेची उमेदवारी दिली नाही. पण कुठेही धुसफूस न दाखवता दोघेही उत्साहाने आज आपल्या स्टेजवर आहेत. याला म्हणतात शिवसैनिक. दुसऱ्यासाठी स्वप्न बघणं आणि ते साकारण्यासाठी झटणं याला म्हणतात शिवसैनिक. मी जे बोलेन तो आदेश समजून आजही ते काम करतायत हा त्यांचा मोठेपणा आहे. एखादी संधी दिली नाही, दुसरी दिली तरी त्या संधीचं सोनं करणारे शिवसैनिक असतात”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
“उद्धव ठाकरे नावाला दीड दमडीची किंमत नाही”
फक्त उद्धव ठाकरे नावाला दीड दमडीची किंमत नाही, असं ते यावेळी म्हणाले. “फक्त उद्धव ठाकरे नावाला दीड दमडीची किंमत नाही. पण उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटल्यावर समोरचा माणूस आदरानं उभा राहातो. मला कुणी मुख्यमंत्री म्हटलं, नाही म्हटलं तरी फरक पडत नाही. पण माझं नाव कुणीच काढून घेऊ शकत नाही”, असं उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना नमूद केलं.
बाळासाहेब ठाकरेंची ‘ती’ आठवण
दरम्यान, यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी पक्षाची फसवणूक करून दुसऱ्या पक्षाला मदत करणाऱ्यांविषयी बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले होते, याची आठवण सांगितली. “आपण फाटाफुटीचं राजकारण भोगत आलो आहोत. पण कितीही फाटलं, तरी शिवसेना अजून मजबुतीनं उभी राहिली आहे, हे इतिहासाला आपण दाखवलं आहे. अशीच फाटाफूट मागे झाली, तेव्हा शिवसेना प्रमुख म्हणाले होते मला आईचं दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको”, अशी आठवण देखील त्यांनी सांगितली.