Thackeray Brothers मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन पक्ष महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकत्र येऊ शकतात अशी शक्यता निर्माण झाली आहे. याचं कारण राज ठाकरेंनी एका मुलाखतीत केलेलं वक्तव्य आणि उद्धव ठाकरेंनी जाहीर भाषणात त्या वक्तव्याला दिलेला प्रतिसाद. शनिवारचा दिवस या एका बातमीने ढवळून निघालेला पाहण्यास मिळाला. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेने एक फोटो पोस्ट केला आहे ज्यात ठाकरे बंधू एकत्र दिसत आहेत. या फोटोमुळे युतीच्या चर्चांना आणखी उधाण आलं आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?

प्रश्न असा आहे की कुठल्याही मोठ्याही गोष्टीसाठी आमच्यातले वाद (ठाकरे बंधू) आमच्यातली भांडणं ही किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी वाद आणि भांडणं या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात मला काही कठीण गोष्ट वाटत नाही. विषय फक्त इच्छेचा आणि तो माझ्या एकट्याच्या इच्छेचा नाही. सगळ्या महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांतील मराठी माणसांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा हे माझं म्हणणं आहे. मी शिवसेनेत होतो तेव्हा बाळासाहेब ठाकरेंशिवाय मी कुणाच्या हाताखाली काम करत नव्हतो. उद्धव बरोबर काम तेव्हाही करत होतोच. आता समोरच्यांची इच्छा आहे का की मी बरोबर काम करावं? असा सवाल राज ठाकरेंनी महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत विचारला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.

उद्धव ठाकरेंचा प्रतिसाद काय?

“अगदी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी देखील तयार आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो. आम्ही जेव्हा लोकसभेच्या वेळी सांगत होतो की गुजरातमध्ये महाराष्ट्रातले उद्योग घेऊन जात आहेत, तेव्हाच विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं. आज महाराष्ट्राच्या हिताचं विचार करणारं सरकार केंद्रात बसवलं असतं आणि महाराष्ट्रातही त्याच विचाराचं सरकार बसलं असतं. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा. मग परत तडजोड करायची असं नाही. महाराष्ट्राचं हित मग त्याच्या आड जो कुणी येईल त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी जाणार नाही त्याचं स्वागत करणार नाही हे आधी ठरवा. मग महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणं नव्हतीच पण जी काही होती ती मिटवून टाकली चला. त्यावेळी सगळ्या महाराष्ट्राने ठरवायचं की भाजपाबरोबर जायचं की माझ्याबरोबर. मग काय ते ठरवा. महाराष्ट्राचं हित हे एकच समोर आहे माझ्या. मग या चोरांना गाठीभेटी आणि कळत नकळत प्रचार करायचा नाही ही आधी शपथ घ्यायची शिवरायांपुढे मग टाळी देण्याची हाळी द्यायची.” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. या दोन्ही प्रतिक्रियांमुळे राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील अशा चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने एक फोटो पोस्ट केला आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेने पोस्ट केलेला फोटो काय?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मातोश्रीच्या दाराबाहेर एकमेकांशी हस्तांदोलन करत आहेत आणि दोघांच्याही चेहऱ्यावर स्मित हास्य आहे असा हा फोटो आहे. अर्थात हा फोटो बराच जुना आहे. पण आत्ता ज्या चर्चा दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे सुरु झाल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर हा फोटो अत्यंत सूचक आहे. यामुळे आता उद्धव ठाकरेंनीही टाळी देण्याची सशर्त तयारी दाखवली आहे. आता दोन भाऊ पुन्हा एकत्र येतील का? हे पाहणं महत्त्वाचं असेल.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे या चर्चा आजवर अनेकदा झाल्या आहेत. दरम्यान या दोघांनीच आता भांडणं विसरुन महाराष्ट्र हित बघायचं ठरवा असं म्हटल्याने या चर्चेला पुन्हा उधाण आलं आहे. दरम्यान येत्या काळात ही युती खरोखर होणार की आधीच्या चर्चांप्रमाणे ही देखील एक चर्चाच ठरणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.