Uddhav Thackeray Shivsena Targets Eknath Shinde: राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना दुसरीकडे गावागावातला शेतकरी मात्र नैसर्गिक संकटांना तोंड देताना मेटाकुटीला आला आहे. काही ठिकाणी अवकाळी तर काही ठिकाणी दुष्काळी संकटामुळे शेतकऱ्यांसमोरची समस्यांची मालिका संपायचं नाव घेत नाहीये. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं शेतकऱ्यांना तातडीनं मदत करून त्यांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी एकनाथ शिंदे सरकारकडे केली आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुका दिवाळीनंतरच होणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र तरीदेखील इच्छुक उमेदवार, संभाव्य उमेदवार, उच्चपदस्थांचे उमेदवार, नाराज उमेदवार अशा सगळ्यांचीच मोठी चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. तसेच, दुसरीकडे सत्ताधारी व विरोधी अशा दोन्ही बाजूला महायुती व महाविकास आघाडीच्या जागावाटपाचीही बोलणी सुरू झाली आहे. प्रत्येक पक्षाकडून वेगवेगळे दावे किंवा मागण्या केल्या जात आहेत. मात्र, दुसरीकडे निसर्गाच्या रुद्रावताराचा फटका शेतकऱ्याला बसत असल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांचा विचार करण्याची मागणी केली जात आहे.

‘गेल्या आठवड्याच्या अखेरीस मराठवाड्यातील सर्व जिल्हे व विदर्भातील काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. पाऊस इतका भयंकर होता की, अवघ्या काही तासांत सर्व नदीनाल्यांना पूर आला. अनेक गावांना पुराचा वेढा पडला. शेतांचे रूपांतर तळ्यांमध्ये झाले व शेतातील सारी पिके शेतकऱ्यांच्या डोळय़ांदेखत जमीनदोस्त झाली. काढणीला आलेल्या किंवा सोंगून ठेवलेल्या मूग, उडीद या पिकांचं नुकसान झालं. कापूस, सोयाबीन, हळद, मका ही शेतातील तरारून आलेली पिके यंदा चांगले उत्पन्न देणार, असे वाटत असतानाच अतिवृष्टीत नष्ट होताना पाहण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली”, अशा शब्दांत सामना अग्रलेखातून मराठवाड्यातील परिस्थिती मांडण्यात आली आहे.

“इव्हेंटबाजीत रमलेल्या खोकेशाही सरकारने…”

‘या भयंकर नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्यासाठी सरकारने तत्काळ पावले उचलायला हवीत. ‘लाडकी बहीण’ योजनेची ‘इव्हेंट’बाजी करण्यात रमलेल्या खोकेशाही सरकारने अतिवृष्टीत उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचे दुःखही समजून घेतले पाहिजे”, अशी टीका ठाकरे गटानं सत्ताधाऱ्यांवर केली आहे.

“ज्यांना मोठं केलं, तेच संकटकाळी सोडून गेले, त्यांना आता…”; शरद पवारांचा नाव न घेता हसन मुश्रीफांवर हल्लाबोल!

‘विदर्भापेक्षा मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक होता. जणू काही ढगफुटी झाली आहे, अशा पद्धतीने सुमारे १८ ते २४ तास अखंड ‘धो-धो’ पाऊस सुरू होता. शनिवारी या पावसाने मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांना व जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला अक्षरशः जलमय केले. यापाठोपाठ दुसऱ्या दिवशी लातूर, बीड, धाराशीव, जालना व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांनाही रविवारी रात्रीपासून सोमवारी सायंकाळपर्यंत भयंकर पावसाने झोडपून काढले”, अशी चिंता ठाकरे गटानं व्यक्त केली आहे.

‘हवंतर इव्हेंट करा, पण मदत करा’

‘हवे तर तुमचे आवडते इव्हेंट करा, पण शेतकरी जगवण्यासाठी बांधावर जाऊन त्यांना आर्थिक मदत दिलीच पाहिजे’, अशी मागणी ठाकरे गटानं केली आहे.

‘विदर्भातील यवतमाळ, वाशीम, अकोला या जिल्ह्यांनाही अतिवृष्टीचा जबर फटका बसला. यवतमाळ जिल्ह्यातील पुसदसह १६ तालुक्यांत तर पावसाने कहरच केला. क्षणभराचीही उसंत न घेता सलग दोन दिवस पावसाने घातलेल्या राक्षसी थैमानाने शेतशिवारांतील उभी पिके तर बरबाद झालीच, पण शेकडो हेक्टरवरील शेतजमीनही या पावसाच्या पाण्याने खरवडून टाकली. पिकांच्या नुकसानीचा भुर्दंड तर शेतकऱ्यांना आहेच, पण शेती पुन्हा लागवडीयोग्य करण्यासाठीदेखील शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागेल”, अशी चिंता ठाकरे गटानं व्यक्त केली आहे.