२०१९ मध्ये महायुतीला जनमताचा कौल मिळाला होता. मात्र उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद अडीच वर्षे वाटून घेण्याचा विषय काढला आणि युती तुटली. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं. महाविकास आघाडीमधल्या शिवसेनेत २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंनी सर्वात मोठं बंड केलं आणि ४० आमदारांना घेऊन ते भाजपासह गेले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबाबत चंद्रकांत पाटील यांनी एक दावा केला आहे.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत य़श

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३७ जागा मिळाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांची दोन ते तीनवेळा भेट घेतली. तसंच आदित्य ठाकरेंनीही भेट घेतली. यानंतर उद्धव ठाकरे बरोबर येणार का? या चर्चाही रंगल्या. मात्र दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाचं उत्तर नाही असं दिलं होतं. दीड महिन्यापूर्वी एका राजकीय मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे आले तर त्यांना बरोबर घेणार का? हा प्रश्न विचारण्यात आला होता. ज्यावर त्यांनी तातडीने नाही म्हटलं होतं. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी भुवया उंचावणारं वक्तव्य केलं आहे.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

अमितभाईंचं (अमित शाह) पाचशे पानी स्वतः तयार केलेलं पुस्तक आहे. हे पुस्तक छत्रपती शिवरायांवर आहे. त्यांनी संदर्भ गोळा केले आहेत पण ते पुस्तक त्यांचं आहे. येत्या काही दिवसांत ते पुण्यात प्रकाशित करायचं की दिल्लीत इतकाच मुद्दा राहिला आहे. ज्या पुस्तकाचं वाचन केल्यानंतर संजय राऊत यांनाही चक्कर येईल. इतका अभ्यास अमित शाह यांनी केला आहे. अशा अमितभाईंबद्दल केवळ तुम्ही सत्तेत नाही तुम्हाला यायचं आहे पण घेत नाहीत. म्हणून किती दुस्वास करणार?

तर उद्धव ठाकरेंना मुंबईत उमेदवार मिळणार नाहीत-चंद्रकांत पाटील

उद्धव ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची समजूत घालून किंवा दिल्लीत चर्चा करुन आली नाहीत तर मुंबईत ठाकरेंना उमेदवार मिळणार नाहीत. अर्थात त्यांनी यायचं की नाही, त्यांना बरोबर घ्यायचं की नाही हे माझे विषय नाही. याचा अर्थ असा आहे का की ते मागे लागलेत? मी एक अंदाज वर्तवला आहे. जर ते आले नाहीत गळती लागत लागत इतकी लागेल की पुणे, कोल्हापूर सोडून द्या ठाकरेंना मुंबईत उमेदवार मिळणार नाहीत. असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.